
सत्तेची हाव कशी असते आणि मित्रांना कसे डावलले जाते हे मी पाहिले आहे. आमचे आवाज वेगवेगळे असले तरीही आमच्या सरकारमध्ये एकमत आहे. किचड मे कमल खिलता है, असे बोलले जाते. पण कुठेही चिखल करून कमळ फुलवा असे यापुढे चालणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेतील पहिल्याच भाषणात भाजपला ठणकावले.
आधीपासून ‘सामना’ वाचला असता तर आमच्या सोबत बसले असते! विरोधी सदस्यांनी राजकीय भाषणे केली. जे पूर्वी ‘सामना’ वाचत नव्हते ते ‘सामना’ वाचायला लागले. आधीपासून ‘सामना’ वाचत असते तर सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर आमच्या सोबत बसले असते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मारताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.
या सभागृहातील दिग्गजांना नमन करतो, ज्यांनी मला सभागृहात पाठवले त्यांना नमन करतो असा आवर्जून उल्लेख करीत आमदार आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळातील आपल्या पहिल्याच भाषणाला सुरुवात केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना अतिशय अचूक आणि अभ्यासपूर्ण भाषण करत विरोधी पक्षात बसल्यावर नुसता गोंधळ घालणार्या भाजप नेत्यांना त्यांनी खडे बोल सुनावले.
विधिमंडळात मागील चार दिवस गोंधळ बघत आहे. मुंबईत दोन दिवस झालेल्या अधिवेशनातही गोंधळ पाहिला. गोंधळ सभागृहात घालायचा, गोंधळ बाहेर घालायचा, देश पेटवून उठवायचा आणि मग राज्य आणायचे ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचीही भूमिका नाही. म्हणून आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून बसलो आहोत आणि भयमुक्त महाराष्ट्र घडवायला निघालो आहोत. महाराष्ट्रात बदल घडवण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले आहेत. रोजगार, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण अशा विषयांवर महाराष्ट्र विकास आघाडीने किमान समान कार्यक्रम आखला आहेच, पण कॉमन मॅक्झिमम प्रोग्रेस हेच महाविकास आघाडीचे ध्येय आहे अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत दिली.
सरकारचे अभिनंदन!
राज्यातील सरकारचे अभिनंदन करताना ते पुढे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे माझे आजोबा आणि त्यांचे सुपुत्र म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या तिघांनी महाराष्ट्रात बदल घडवण्यासाठी नवी दिशा देण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी सक्षम सरकार एकत्र आल्याने सर्वप्रथम सरकारचे अभिनंदन करतो.
नोटबंदी-जीएसटीवर विरोधक गप्प
मेक इन महाराष्ट्र, उद्योगाला चालना मिळाली होती. पण 2016मध्ये केलेल्या नोटबंदीवर कोणी बोलत नाही. विरोधी पक्षही नोटबंदीवर बोलायला घाबरतो. आम्ही त्यांच्या सोबत असताना लोकसभेत जेव्हा यावर विषय काढला जायचा तेव्हा यावर बोलू नका, असे सांगितले जायचे. तो विषय आपण बाजूला ठेवला आहे, असे सांगण्यात येत होते. नोटबंदीनंतर जीएसटी चुकीच्या मार्गाने आली त्याच्यानंतर उद्योगधंदे बंद झाले. शेतकऱयांची वाट लागली. ग्रामीण व शहरी भागात सगळेच ठप्प झाले आहे. रोजगार पुढे आणायचा असेल तर वेगवेगळ्या विषयांवर विचार करण्याची गरज आहे.
वचनपूर्ती करणार
राज्यपालांच्या या भाषणातील प्रत्येक गोष्ट ही वचन आहे आणि वचनपूर्ती हे सरकार करणार आहे याची खात्री आहे यात कोणताही जुमला नाही. महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम असला तरी महाविकास आघाडीचे एकच ध्येय आहे की, कॉमन मॅक्झिमम प्रोग्रेस हेच ध्येय आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आदित्य ठाकरे यांचे भाषण पूर्ण होताच सर्वच पक्षांच्या सदस्यांनी जोरात बाके वाजवली. सर्वच पक्षांच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
लोकशाहीची ताकद
या चर्चेत विरोधी सदस्यांनी सामनाचे कात्रण सभागृहात दाखवले होते. त्याचा धागा पकडत आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेने राष्ट्रवादीवर काय वक्तव्य केले, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेवर काय वक्तव्य केले, मुख्यमंत्री निवडणुकीपूर्वी काय बोलले हे सांगण्याचा प्रयत्न झाला, पण महाराष्ट्रात लोकशाही नक्की काय असते ते या सरकारने दाखवून दिले. वादसंवाद होतात पण या वादातून नवा महाराष्ट्र घडवू शकतो. वेगवेगळे आवाज, पण आपण सर्व एक आहोत. ही एक ताकद या सरकारने दाखवून दिली आहे. लोकशाहीची ही ताकद लोकशाहीविरोधी पक्षाला समजणार नाही, असा टोला त्यांनी भाजपला मारला.






























































