
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी आज मालेगाव शहरात दस्तुर-ए-हिंद बचाव कमिटीने भव्य मोर्चा काढला, यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. नाशिक शहरातही संध्याकाळी या संविधानविरोधी कायद्याच्या निषेधार्थ रॅली निघाली. मालेगाव येथे नागरिकत्व सुधारणा कायदाच रद्द करावा, अशी मागणी करीत हजारोंच्या संख्येने नागरिक आज रस्त्यावर उतरले. भुईकोट किल्ला येथून सकाळी 10 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. चंदनपुरी गेट, आझादनगर, सुलेमानी चौक, मशावरत चौक, किदवाई रोडमार्गे शहीद स्मारक येथे या मोर्चाचे जनसभेत रूपांतर झाले. या मोर्चात मुस्लिमधर्मीयांसोबतच हिंदू बांधवही सहभागी होते. बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.


























































