
>> विद्या कुलकर्णी
लाल ठिपकेवाली मुनिया, तीन रंगी मुनिया, पांढऱ्या पोटाची मुनिया, चंदेरी मुनिया आणि ठिपकेवाली मुनिया. सर्वच प्रकारच्या मुनिया अतिशय नाजूक व दिसायला सुंदर आहेत.
मुंबईजवळील डोंबिवली उपनगरात माझ्या मैत्रिणीबरोबर गेले होते. तेथे मी पाण्याच्या टाकीभोवती लाल मातीच्या जमिनीवर ओलसर गवतावरून हातात कॅमेरा घेऊन पक्ष्यांचा मागोवा घेत होते. सकाळी कोवळय़ा उन्हात त्यांची बरीच हालचाल चालू होती. समोरच अतिशय उत्साही रंगीबेरंगी पक्ष्यांचा थवा गवतात बिया वेचताना दिसला. पक्षी अगदी चिमुकले होते. जरा जवळून बघूया म्हणून शक्यतो कमी आवाज करत त्या पक्ष्यांच्या जवळ गेले तर क्षणात सर्व उडून गेले. शेवटी मी दुरूनच त्या पक्ष्यांचे फोटो घेण्याचे ठरविले. चिमणीच्या आकाराचे हे पक्षी होते ‘मुनिया’. फारच लोभस दिसत होते.
मुनियांचे पाच प्रकार आपल्या महाराष्ट्रात आढळून येतात. लाल ठिपकेवाली मुनिया, तीन रंगी मुनिया, पांढऱया पोटाची मुनिया, चंदेरी मुनिया आणि ठिपकेवाली मुनिया. सर्वच प्रकारच्या मुनिया अतिशय नाजूक व दिसायला सुंदर आहेत.
लाल मुनिया
लाल मुनिया हे पक्षी हिंदुस्थान, बांगलादेश, पाकिस्तान, ब्रह्मदेश इथे आढळतात. या पक्ष्यांचे वास्तव्य उंच गवत असलेल्या दलदली प्रदेशात आणि त्या भोवतालच्या झाडाझुडपांच्या जंगलात असते.
नराचा रंग लाल भडक असून त्यावर पांढरे ठिपके असतात. पोटाचा रंग काळसर असतो. वरील भागाचा रंग तपकिरी असतो. नर व मादी यांची चोच, डोळे आणि शेपटीचा वरील भाग लाल रंगाचा असतो. मादीच्या पाठीचा रंग तपकिरी असून त्यावर पांढरे ठिपके असतात.
मादी एका वेळी 4 ते 6 पांढरी शुभ्र अंडी देते. अंडी उबविणे, पिल्लांना खाऊ घालणे, स्वच्छता ठेवणे, देखरेख करणे आदी सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
या पक्ष्यांचा लाल भडक रंग अतिशय सुरेख असल्यामुळे हे पक्षी मोठय़ा प्रमाणात पाळले जातात.
खवल्याची मनोली / ठिपकेदार मुनिया
ठिपकेदार मुनिया राजस्थान, पंजाब, हिमालयाचा काही भाग वगळता संपूर्ण देशभर दिसून येणारा पक्षी असून याच्या आकारावरून आणि रंगावरून दोन उपजाती आहेत. हिमाचल प्रदेशात मात्र मोठय़ा प्रमाणात मुनिया सापडतात.
प्रजननाच्या काळात नर गडद तपकिरी रंगाचा होतो. त्यावर असलेले काळे-पांढरे ठिपके यांची मुख्य ओळख आहे. थव्याने राहणे हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. एकाच परिसरात अनेक नर-मादी यांच्या जोडय़ा आपली घरटी बांधून राहतात.
जुलै ते ऑक्टोबर हा ठिपकेदार मुनियाच्या प्रजननाचा काळ असून त्यासाठी ते गवतात किंवा झुडपात आपले घरटे बांधतात. पावसाळय़ाच्या सुरुवातीला गवताची लांब पाती घेऊन घरटय़ाच्या दिशेने उडत निघालेल्या मुनिया नेहमी दिसतात. त्यांची घरटी म्हणजे गवताचा मोठा पुंजकाच असतो. मादी एका वेळी शुभ्र पांढऱया रंगाची 4 ते 8 अंडी देते. नर-मादी मिळून अंडी उबविणे, पिल्लांचे संगोपन करणे अशी सर्वच कामे एकत्र करतात. एखादा धोका जाणवला की वेडा राघू पक्षी किणकिणणारा आवाज काढून जमिनीवरच्या मुनियांना सावध करतो. लगेच सगळे मुनिया जमिनीवरून उडतात
पांढऱया पुठ्ठय़ाची मनोली
हे पक्षी आशिया, दक्षिण चीन, तैवान व सुमात्रा येथे आढळतात. या पक्ष्यांचे वास्तव्य गवताळ भागात, झाडाझुडपांच्या भागात असते. नर व मादी सारखेच दिसतात, फक्त नराचे डोके व चोच थोडी बोजड असते. घरटे झाडावर, झाडाझुडपात किंवा गवतात बांधतात. ते गवतापासून बनविलेले घुमटाच्या आकाराचे असते. कधी कधी सुगरण पक्ष्यांचे टाकलेले घरसुद्धा हे पक्षी वापरतात. मादी एका वेळी 3 ते 8 अंडी घालते. या पक्ष्यांचा वावर पाण्याच्या जवळ जास्त प्रमाणात असून ते पाण्यातील वनस्पती खाताना आढळतात, त्यापासून त्यांना प्रोटीन मिळते.मुनियाचे फोटो काढणे हा एक सुखद अनुभव होता. इवल्याशा पक्ष्यांमध्ये किती विविध रंग, नक्षीकाम व त्यांच्या लोभस हालचाली बघून आपण थक्क होऊन जातो.

























































