घुसखोर आणि शरणार्थीमध्ये काय आहे फरक? पंतप्रधान म्हणतात…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामलिला मैदानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी नागरिकता सुधारणा कायद्याचा देशातील 130 कोटी जनतेशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तसेच या कायद्याबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात असून वोटबँकेसाठी हे सुरू असल्याचा टोलाही मोदींनी लगावला. यावेळी त्यांनी घुसखोर आणि शरणार्थीमधील फरकही स्पष्ट केला.

दिल्लीतील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी घुसखोर आणि शरणार्थीतील अंतर समजून सांगितले. घुसखोर कधीही आपली ओळख सांगत नाही आणि शरणार्थी कधीही आपली ओळख लपवत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नागरिकता सुधारणा कायद्यामुळे घुसखोर घाबरले असून त्यांचे सत्य समोर आले आहे, असेही मोदी म्हणाले.

ममतादीदींना टोला
नागरिकता सुधारणा कायद्यावरून संयुक्त राष्ट्राकडे धाव घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोदींनी टोला लगावला. आज ममतादीदी कोलकातामधून थेट संयुक्त राष्ट्रात पोहोचल्या आहेत, परंतु काही वर्षांपूर्वी याच ममतादीदी संसदेमध्ये उभ्या राहून बांगलादेशमधून आलेल्या घुसखोरांना रोखण्याची आणि तिथून आलेल्या पीडित शरणार्थींना मदत करण्याची मागणी करत होत्या. आता असे काय झाले? आता भूमिका का बदलली? अफवा का पसरवल्या जात आहेत? असा सवाल मोदींनी उपस्थित केला.