
काँग्रेसकडून मतांच्या राजकारणासाठी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत असे सांगतानाच हिंदू धर्म हा सर्वसमावेशक आहे. हिंदुस्थानातील मुस्लिमांना इतर देशांत गेल्यावरही हिंदू म्हणूनच ओळखले जाते. मग हिंदू असणे हे पाप आहे का, असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. हिंदू ही जीवन जगण्याची पद्धती आहे. ंिंहदूंना जातीयवादी म्हणणाऱयांनी ही गोष्ट समजून घ्यायला हवी, असेही गडकरी म्हणाले.
नागरिकत्व कायदा हा हिंदुस्थानी मुस्लिमांच्या विरोधात नाही. त्यांच्यावर सरकार कधीही अत्याचार होऊ देणार नाही, असेही गडकरी म्हणाले. नागपुरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ लोकाधिकार मंच आणि इतर संघटनांच्या माध्यमातून भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर गडकरींनी सभेला संबोधित केले. हिंदुस्थानात अत्याचारग्रस्तांना आधार दिला जाईल, परंतु घुसखोरांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. भाजपा सरकारचे काम हिंदुस्थाच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या चाकोरीत राहूनच सुरू आहे, असेही गडकरी म्हणाले. दरम्यान, हा कायदा कुठल्याही धर्माविरोधात किंवा जातीविरोधात नाही. या कायद्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. या कायद्याबाबत पसरवल्या जात असलेल्या गैरसमजाच्या निषेधार्थ फडणवीस कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले.
पाकिस्तानात 3 टक्के हिंदू उरले
पाकिस्तानातील हिंदूंच्या घटत्या संख्येबाबतही गडकरी यांनी भाष्य केले. पाकिस्तानमध्ये 22 टक्के हिंदू होते ते आता केवळ 3 टक्क्यांवर आल्याचे गडकरी म्हणाले. अनेकांचे धर्मांतरण झाले असून त्यांच्यावर अत्याचारही झाल्याचे गडकरी म्हणाले. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श असून त्यांनी कधीच कोणती मशीद पाडली नाही किंवा मुस्लिमांवर अत्याचार होऊ दिला नाही. त्यामुळे त्यांच्यावर भाजप सरकार कधीच अत्याचार होऊ देणार नाही, असे आश्वासनही गडकरी यांनी दिले.
























































