सरकारच्या योजना घराघरांत पोहचवा! उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्याचा लाभ राज्यातील नागरिकांना झालाच पाहिजे आणि त्यासाठी सरकारच्या योजना घराघरांत पोहचवा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसैनिकांना दिले.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आज शिवसेना जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची पहिली बैठक दादर येथील शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. नव्या सरकारने नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात अनेक कल्याणकारी निर्णय घेतले. शेतकऱयांना कर्जमाफी देण्याचे वचन पूर्ण केले. त्याचबरोबर जनतेच्या सोयीसाठी राज्यातील प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय, दहा रुपयांमध्ये शिवभोजन, विदर्भात स्टील प्रकल्प, धान उत्पादक शेतकऱयांना अनुदान, अन्नप्रक्रिया क्लस्टरची उभारणी, आशा कार्यकर्त्यांना मानधन आदी निर्णयही घेतले. या निर्णयांचा आणि योजनांचा फायदा राज्यातील जनतेला झाला पाहिजे. त्यासाठी त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचणे आवश्यक असून योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदोपत्री प्रक्रियाही पूर्ण होणे गरजेचे आहे. शेतकरी आणि जनसामान्यांना त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

या बैठकीला शिवसेना नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, गृहमंत्री एकनाथ शिंदे, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेते रवींद्र मिर्लेकर, अरविंद नेरकर, माजी आमदार दगडू सकपाळ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवसेना भवनात जंगी स्वागत

मुख्यमंत्री झाल्यानंतर आज प्रथमच शिवसेना भवनात आलेल्या उद्धव ठाकरे यांचे मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांचे स्वागत करणारी होर्डिंग्ज शिवसेना भवनासमोर लावण्यात आली होती. उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात पोहचताच ढोलताशांच्या गजराने परिसर दुमदुमला. शिवसैनिकांनी भगवे झेंडे उंचावून जल्लोष केला. शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनातील भवानीमातेचे दर्शन घेतले, तसेच शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले.