तारकर्ली ग्रामस्थांकडून व्हेल माशाला जीवनदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तारकर्ली येथील मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी गेले असता त्यांच्या जाळय़ात सुमारे दहा ते पंधरा फूट लांबीचा व्हेल मासा अडकला. दरम्यान, जाळय़ासह माशाला किनाऱयावर आणून अन्य मच्छीमार आणि ग्रामस्थांच्या मदतीने जाळय़ातून माशाची सुटका करत त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले.

तारकर्ली येथील राजाराम खराडे आणि लवू कुबल यांना मासेमारी करताना त्यांच्या जाळय़ात व्हेल मासा अडकला. राजाराम खराडे स्वतः सागर रक्षक म्हणून कार्यरत असल्याने त्यांनी काळजीपूर्वक या माशाला किनाऱयाला आणले. याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी मच्छीमारांच्या बोटीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी विष्णू कुबल यांच्या मदतीने अनिल टिकम, दादा कांबळी, आबा देऊलकर, दीपक रामचंद्र कुबल, दादा खराडे, सहदेव चिंदरकर, लक्ष्मण मोंडकर व इतर ग्रामस्थांनी व्हेल माशाला जाळय़ातून मोकळे करत पुन्हा समुद्रात सोडले.

‘व्हेल’ पुन्हा समुद्रात
माशाची जाळय़ातून सुटका होताच रश्मिन (राजा) रोगे, हर्षद खराडे, भूषण धुरत या स्थानिक डाईव्ह मास्टर्सनी आपल्या स्कुबा कौशल्याचा मदतीने सदर व्हेल माशाला खोल समुद्रात नेऊन सोडण्यासाठी मेहनत घेतली.