
नाताळ आणि थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा करण्याच्या फुल टू मूडमध्ये असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. यंदाही या दोन्ही दिवशी ऑर्केस्ट्रा बार, हॉटेल, रेस्टॉरंट पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे घराबाहेर पार्टी करण्याचा बेत आखणाऱ्यांना ‘खाण्यापिण्या’चे टेन्शन न घेता पहाटे पाचपर्यंत मनसोक्त धम्माल करता येणार आहे. पण त्याचवेळी हँगओव्हर होऊन रंगाचा बेरंग करणाऱ्यांना मात्र नववर्षाची सुरुवात अवघड होऊ शकते.
मुंबईत हॉटेल, ऑर्केस्ट्रा बार, रेस्टॉरंट मध्यरात्री दीड तर वाईन शॉपना दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. परंतु नाताळ व थर्टी फर्स्टनिमित्त वाईन शॉप वगळता हॉटेल, ऑर्केस्ट्रा बार, रेस्टॉरंटला पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. तर वॉईन शॉप रात्री 11.30 पर्यंत आणि परमिट रूम मध्यरात्री 1.30 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. यामुळे नाताळ व थर्टी फर्स्टला पार्टी मूडमध्ये असणाऱ्यांना हव्या त्या हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये जाऊन धम्माल करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तसेच वॉईन शॉपमधून उशिरापर्यंत दारू घेता येणार असल्याने चिअर्स करीत पेगवर पेग रिचवता येणार आहे.
पण हे लक्षात ठेवा
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पाच हजारांचा दंड किंवा सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल.
- सांगितलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी दारू ढोसताना आढळल्यास दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
- नाताळ आणि वर्षाचा शेवट करताना मद्य सेवन परमिट रूम किंवा घरी करावे. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी करू नये.
- लहान मुलांसमोर दारूच्या पाटर्य़ा करू नका. तसेच इतरांना त्रास होईल असे प्रकार होऊ देऊ नका.
गेल्या काही दिवसांत उत्पादन शुल्क विभागाने मोठय़ा प्रमाणात बनावट मद्याचा साठा पकडला आहे. नाताळ आणि थर्टी फर्स्टला मद्याला होणारी मोठी मागणी लक्षात घेता बाजारात नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट मद्य विक्रीसाठी आणण्याची दाट शक्यता आहे. असे मद्य आरोग्यास हानीकारक असून मोठे आर्थिक नुकसान करणारे आहे. त्यामुळे मद्यपींनी याची काळजी घ्यावी, असे उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता वर्मा यांनी सांगितले.




























































