
या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण उद्या, 26 डिसेंबरला असून ते कंकणाकृती स्थितीत दिसणार आहे. सूर्यग्रहणामुळे शिर्डी साईबाबा मंदिर आज सकाळी तीन तास बंद राहील. सकाळी 8.05 ते सकाळी 11 या काळात भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार नाही, असे शिर्डी साईबाबा संस्थानने कळवले आहे.
नाताळच्या सुट्टीत दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. उद्या तर गुरुवार आहे. सूर्यग्रहणामुळे सकाळी मंदिर बंद राहिल्याने गर्दीत आणखी भर पडेल. मात्र भाविकांना दुपारनंतर साईदर्शन करता येईल.
ग्रहण काळात साईबाबा मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. सकाळी 8 वाजता मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येईल. त्यानंतर 8.05 ते 11 वाजेपर्यंत मंत्रोच्चार होतील. त्यानंतर सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी श्रींचे मंगल स्नान होईल. त्यानंतर 11.25 मिनिटांनी आरती होईल आणि दुपारी मध्यान्ह आरती होईल. त्यानंतरच दर्शनाला सुरुवात होईल. ग्रहण काळात साईसमाधी आणि साई मूर्तीला दुर्वा- तुळशीचे आच्छादन घालण्यात येईल.
दक्षिण हिंदुस्थानात कंकणाकृती, तर महाराष्ट्रात खंडग्रास
कंकणाकृती सूर्यग्रहणाची स्थिती कर्नाटक, तामीळनाडू आणि केरळ या राज्यांतील काही भागांतून दिसणार आहे, तर महाराष्ट्रातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. मुंबईत सकाळी 8.04 वाजता ग्रहणाला सुरुवात होणार असून ग्रहणमध्य सकाळी 9 वाजून 21 मिनिटांनी होईल. ग्रहण समाप्ती 10.55 वाजता होईल. याआधी 9 वर्षांपूर्वी 15 जानेवारी 2010 रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती हिंदुस्थानातून दिसली होती. यानंतर पुढच्या वर्षी 21 जून 2020 रोजी होणाऱया सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती पंजाब, राजस्थान, हरयाणा व उत्तराखंड या राज्यांतील प्रदेशांतून दिसणार आहे. उर्वरित हिंदुस्थानातून त्यावेळीही खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे.
पंढरपूर गर्दीने फुलले
नाताळच्या सुट्टीमुळे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर गर्दीने फुलून गेले आहे. पंजाब, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात यासह देशाच्या विविध भागांतून सुमारे 4 लाख पर्यटक पंढरपूरात दाखल झाले आहेत. उद्या सूर्यग्रहण असल्याने मंदिराने पूजाअर्चेच्या वेळेत बदल केले असले तरी पर्यटकांच्या संख्येवर कोणताही परिणाम झालेला नाही.
-ग्रहणाच्या काळात आंध्रप्रदेशातील वेंकटेश्वर मंदिर आणि सबरीमाला मंदिर 26 डिसेंबरपर्यंत जवळपास 13 तास बंद राहणार आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थानने सांगितलेल्या माहितीनुसार, मंदिर 25 डिसेंबर रोजी 11 वाजता बंद झाले. त्याचा शुद्धी समारोह 26 डिसेंबर रोजी दुपारी 12 नंतर केला जाईल.
सिद्धिविनायकाचे लांबूनच दर्शन
ग्रहण कालावधीत उद्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात पहाटे 5 वाजता आरती होईल. श्रींचे दर्शन सकाळी 6 ते 7.30 वाजता होईल. ग्रहण कालावधीत भाविकांना श्रींचे दुरून दर्शन दिले जाईल. तसेच सकाळी 8 ते 10.55 पर्यंत श्रींवर जलाभिषेक होईल. ग्रहण समाप्तीनंतर सकाळी 11.30 ते दुपारी 12.05 वाजता पूजा आणि त्यानंतर गाभाऱयातून श्रींचे दर्शन दुपारी 12. 30 वाजल्यापासून सुरू होईल.
























































