
डोक्यावर बँकेचे 17 लाखांचे कर्ज, वडील कॅन्सरने वारले. त्यात हातउसने घेतलेल्या पैशांसाठी अनेकांनी तगादा लावला. जमीन विकून कर्ज फेडण्याची इच्छा आहे पण बँक ना जमीन विकू देतेय, ना कर्जाचा बोजा कमी होतोय. यामुळे हताश होऊन जीवन संपवायला निघालेले नांदेड येथील शेतकरी धनाजी जाधव आत्महत्येचे सामान घेऊन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आले, मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना धीर देत आश्वस्त केले तेव्हा हे बळीराजाचे सरकार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत धनाजी जाधव आनंदाने घरी परतले.
शेतकरी धनाजी जाधव यांच्यावर आयडीबीआय बँकेचे 17 लाख रुपयांचे कर्ज झाले आहे. या 17 लाखांच्या कर्जापोटी बँकेने शेतकऱयाची तब्बल 1 कोटी 50 लाख रुपये किमतीची जमीन ओलीस ठेवली आहे. ही जमीन विकून बँकेचे कर्ज फेडण्याची जाधव यांची इच्छा आहे पण बँक ना जमीन विकू देतेय, ना जमिनीची कागदपत्रे देत आहे. कर्जबाजारीपणामुळे जगण्याचे सर्व मार्ग संपल्याने शेवटचा मार्ग म्हणून धनाजी जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री भेटलेच नाहीत तर शेवटी आत्महत्या करायची या विचाराने सोबत आत्महत्येचे सामान घेऊनच मंत्रालयात पोहचले. मुख्यमंत्री मंत्रालयात नसल्याचे कळताच निराश झालेल्या शेतकरी जाधव यांनी सह्याद्री अतिथीगृह गाठले.
पूर्वनियोजित बैठका थांबवल्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या शेतकऱयाच्या हलाखीच्या परिस्थितीची माहिती मिळताच त्यांनी आपल्या पूर्वनियोजित बैठका थांबवल्या. तसेच तत्काळ शेतकरी जाधव यांना भेटीसाठी बोलावून घेतले. त्यांच्या अडचणी समजून घेत तत्काळ नांदेड जिल्हाधिकाऱयांना फोन करून प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले. या भेटीपूर्वी हताश असलेले धनाजी जाधव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर जगण्याच्या उमेदीने आनंदाने परतले. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी या भेटीत महत्वाची भूमिका पार पाडली.





























































