अनंत अमुची ध्येयासक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुवर्णा क्षेमकल्याणी

काही दिवसांपूर्वीच जागतिक स्थलांतर दिन साजरा करण्यात आला. माणूस या ना त्या कारणाने स्थलांतर करत असतोच, पण अवघ्या तीन वर्षांत तब्बल पाच खंड आणि 35 देश भटकंती करून असा आगळा वेगळा विक्रम करणारे विष्णुदास चापके ऊर्फ ‘विष्णू द गामा’ यांना खरंच सलाम ठोकावासा वाटतो. तीन वर्षांतला हा प्रवास कसा होता याविषयी विष्णुदास चापके यांच्याशी केलेली ही खास बातचीत…

19 मार्च 2016 ला तुमच्या प्रवासाला सुरुवात झाली. हा प्रवास करावा असं का वाटलं?
– डिसेंबर 2015 ला मी दोन दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आणि तेव्हा एका अर्थाने मानसिक जडण घडण झाली, कारण आपल्या शरीराला केव्हाही काही होऊ शकतं. आपल्या शरीराची किंवा जीवनाची आपण हमी देऊ शकत नाही याची जाणीव झाली तेव्हा मनात आलं जोपर्यंत शरीर साथ देतंय तोपर्यंत फिरून घ्यायला हवं. आणि ते प्रत्यक्ष कृतीत आणलं गेलं. प्रवासाला सुरुवात झाली ती मुंबईतल्या ठाण्यापासून ते कोलकात्यापर्यंत…आणि असं करत करत एक मोठा पल्ला नकळतपणे गाठला गेला…!

 भटकंतीची आवड बालपणापासूनच होती का? याशिवाय तुम्ही शेतकरी कुटुंबातले, त्यांनतर पत्रकारितेची नोकरी, मग भटकंतीने तुम्हाला नेमकी कधी साद घातली?
– भटकंतीची आवड खरं तर लहानपणापासून नव्हती, पण तेव्हा गरजेपोटी थोडीफार भ्रमंती व्हायची. पत्रकारितेत आल्यावर माझ्या सुपरव्हिजनमध्ये एक इंटर्नशिपसाठी एक मुलगी होती. तिचं नाव होतं कॅरोलिन डेकला, जी फ्रान्सहून आली होती. साधारण 2 -3 महिने हिंदुस्थानात तिचं वास्तव्य होतं. प्रोजेक्टचं काम पूर्ण झाल्यावर तिने सुट्टीच्या दीड-दोन महिन्याच्या कालावधीत हिंदुस्थानचा बराचसा भाग फिरून घेतला, म्हणजे अगदी उत्तर प्रदेश, बिहार, केरळ ते अगदी पंजाबपर्यंत ती फिरली. तेव्हा असं वाटलं की, ही परदेशातली मुलगी जिला इथल्या स्थानीय भाषासुद्धा येत नाहीत, पण तिच्याकडे आवश्यक धाडस नक्की आहे. ती इथे एकटी फिरू शकते मग आपण असा प्रयत्न का करत नाही, असाही विचार त्या दरम्यान मनात घोळत होता. या विचाराला खतपाणी मिळालं ते कमांडर दिलीप डोंडे यांच्या मुलाखतीच्या प्रेरणेतून आणि आपणही भटकंती करायला हवी हा विचार पक्का झाला.

अशी म्हण प्रचलित आहे की, ‘मी बारा गावचं पाणी प्यायलोय’. तुम्ही तर तब्बल 35 देश फिरलायत काय सांगाल.

– मी असं म्हणीन की जगात भटकंती करणारे अनेक लोक आहेत त्यामुळे मी फार काही वेगळं केलय अशातला भाग नाही, पण मनात एक इच्छा होती आणि धाडसाने, जिद्दीने ती पूर्ण केली याचं नक्कीच समाधान आहे.

पर्यटन आपलं आयुष्य खऱया अर्थाने समृद्ध करतं. तुम्हालाही भटकंती दरम्यान अनेक चांगले वाईट अनुभव आले असतील. भटकंती नंतर तुमच्या आयुष्यात कोणते बदल झाले?

– नक्कीच भटकंती तुम्हाला समृद्ध करते, चाकोरीबाहेर जाऊन जगणं तुम्हाला शिकता येतं. एखाद्या गावापुरते, शहरापुरते मर्यादित जीवन जगण्यात आणि वेगवेगळ्या भागात भटकंती करण्यात खूप फरक आहे. त्या त्या ठिकाणची संस्कृती, भाषा, माणसं या प्रत्येकातून आपण काही ना काही शिकत असतो. आपण या सगळ्या दृष्टीने प्रगल्भ होत जातो, सहनशीलता वाढीस लागते. माणसांचं महत्त्व, टीम स्पिरिट या गोष्टी कळू लागतात. आपण या जगात किती नगण्य आहोत, जग किती मोठं, अथांग आहे याची जाणीव होते. भटकंती दरम्यान परप्रांतात होणारे मित्र, त्यांच्यासोबत होणारी विचारांची देवाणघेवाण, त्यातून मिळणारी अनुभवांची शिदोरी हे सगळं तुम्हाला आयुष्य जगताना खूप मदत करतं..!

प्रवास करायला जशी इच्छाशक्ति लागते तसाच पैसाही लागतो,तुम्ही ही आर्थिक बाजू कशी सांभाळली, त्यासाठी तुम्हाला कोणी कोणी सहकार्य केलं?
– याचे मी प्रामुख्याने तीन टप्पे करीन. सुरुवातीला हिंदुस्थान ते बँकॉक हा प्रवास करण्यासाठी जो काही खर्च लागला तो मी माझ्या सेविंग्समधून वापरला. 7-8 वर्षं नोकरी केल्यामुळे एक चांगली रक्कम मला यासाठी मिळाली. त्यांनंतरच्या प्रवासात मला माझ्या काही मित्रांनी आर्थिक साहाय्य केलं. त्यापुढच्या टप्प्यासाठी तर टाटा सोशल ट्रस्टतर्फे मला जवळजवळ 15 लाखांची स्पॉन्सरशिप पुरवली गेली, त्यात प्रवास केल्यानंतर माझ्याकडे 6 लाख रुपये शिल्लक होते. त्या उर्वरित रकमेतले एक लाख रुपये वापरून परभणीतल्या 9-10वीतल्या विद्यार्थ्यांना शालेय पाठय़पुस्तकं विकत घेऊन दिली आणि पाच लाख ही रक्कम ट्रस्टकडे हिशेबासहित परत केली. प्रवासात मी कटाक्षाने हे पाळलं की, कमीत कमी खर्चात जास्त प्रवास कसा करता येईल. काही गोष्टींमुळे अनावश्यक खर्च मला टाळता आला. एकूणच मला या भटकंतीदरम्यान अनेकांचं आर्थिक सहाय्य मिळालं.

तुम्ही कोणकोणते खंड पादाक्रांत केलेयत?
– मी एकूण पाच खंड फिरलोय, ज्यात 35 देशांचा समावेश होतो. यामध्ये आशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका व युरोप या पाच खंडांचा समावेश होतो .

प्रवास करताना तुम्हाला कोण कोणत्या अडचणी आल्या?
– भटकंतीसाठी देशाबहेर पडल्यानंतर येणाऱया सगळ्या अडचणी मला आल्या. राहायचं कुठे, शुद्ध शाकाहारी खाणं असे बरेच प्रश्न होते. येणारा प्रत्येक दिवस त्या दिवसाची आव्हानं घेऊन यायचा. कधी भाषेचा अडसर, कधी माहितीअभावी येणारी संकटं. व्हिसा मिळवताना येणाऱया अडचणी. काही ठिकाणी व्हिसा मिळवण्यासाठी 2 ते 3 महिने सुद्धा लागले.

ज्यांना भटकंती करायचीय त्यांनी बचत करून किंवा वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करून भटकंती कशी करावी त्याविषयी काय सांगाल.
-जर कुणी नव्याने भटकंतीला सुरुवात करत असेल तर त्यांना मी सांगीन की सुरुवात गड किल्ल्यांपासून करा, कारण तिथे खरा कस लागतो तुमच्या शारीरिकतेचा. तुम्ही मोठा प्रवास करण्यासाठी शारीरिकदृष्टीने सक्षम आहेत का याचा तुम्हाला एक अंदाज येतो. आर्थिकदृष्टय़ा हे तसं सहज शक्य आहे. दरम्यान चांगले मित्र मिळतात, निसर्गाशी मैत्री होते. अशा रीतीने या एक दिवसीय सहलीपासून हळूहळू आपल्या मर्यादा लक्षात घेऊन 7 ते 8 दिवसांची भटकंती आपण आखू शकतो. तिथली भौगोलिक परिस्थिती, हवामान, अन्न-पाणी यात तुम्ही कशाप्रकारे स्वतःला सांभाळून घेऊ शकता हे एकदा लक्षात आलं की, हळूहळू मोठा पल्ला गाठण्याचा प्रयत्न करायचा. अशाप्रकारे पायरी पायरीने हा प्रवास करणं सोपं जाईल.

– [email protected]