सनबर्नसाठी गोव्यात आलेल्या दोन तरुणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

उत्तर गोव्यातील वागतोर येथे आयोजित सनबर्न क्लासिक इडीएम फेस्टिवलसाठी आलेल्या दोन तरुणांच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.पोलीसांनी दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, या दोन युवकांचा मृत्यू ड्रग्सच्या अतिसेवनाने झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मृतांमध्ये एक तरुण आंध्रप्रदेशचा तर दूसरा हैदराबाद येथील असल्याची माहिती मिळाली आहे. या दोन तरुण सनबर्न सुरु होण्यापूर्वी बॉक्सऑफिसजवळ आले असताना अस्वस्थ्य वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यात एकाचा रुग्णालयात तर एकाचा रुग्णवाहिकेत मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मृतांपैकी एकजण वेंकट नावाचा 26 वर्षाचा तरुण असून तो आंध्रप्रदेश येथील होता. तर दूसरा साई प्रसाद हा 31 वर्षीय तरुण हैदराबाद येथील होता. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीसांनी दोघांचा मृत्यू हार्ट अॅटॅकने झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे पोलीसांनी सांगितले. उत्तर गोव्यातील वागातोर किनाऱ्यावर सनबर्न क्लासिक इडीएम फेस्टिवल शुक्रवारपासून सुरु झाला असून त्यात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. तीन दिवस हा फेस्टिवल चालणार आहे.