
सर्वाधिक 41 वेळा रणजी चॅम्पियन ठरलेल्या मुंबईचा वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लढतीत तीन दिवसांतच खेळ खल्लास झाला. रेल्वेने यंदाच्या रणजी मोसमातील सर्वात धक्कादायक निकाल नोंदवला. कर्णधार कर्ण शर्माच्या अष्टपैलू खेळीसह गोलंदाजांनी दोन्ही डावांमध्ये केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर रेल्वेने शुक्रवारी 10 गडी राखून मुंबईचा धुव्वा उडवला आणि सात गुणांची कमाई केली. कर्ण शर्माची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
फक्त सूर्यकुमारचे अर्धशतक
मुंबईने 3 बाद 64 या धावसंख्येवरून तिसऱया दिवशी पुढे खेळायला सुरुवात केली, पण मुंबईच्या फलंदाजांना खेळपट्टीवर उभे राहून डाव सावरता आला नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवने 12 चौकारांसह 65 धावांची खेळी साकारत थोडीफार झुंज दिली.
दुसऱया डावातही निराशा
अजिंक्य रहाणे (8 धावा), आदित्य तरे (14 धावा), शम्स मुलानी (1 धाव) या मुंबईच्या फलंदाजांना अपयशाला सामोरे जावे लागले. आकाश पारकरने नाबाद 35 धावा केल्या. पहिल्या डावात 114 धावांवर गडगडणाऱया मुंबईला दुसऱया डावातही ठसा उमटवता आला नाही. 198 धावांमध्येच त्यांचा दुसरा डाव गडगडला. हिमांशू सांगवानने 60 धावा देत 5 फलंदाज बाद केले. टी. प्रदीप व कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
12व्या षटकात विजय
मुंबईकडून मिळालेल्या 47 धावांचा पाठलाग करणाऱया रेल्वेने अवघ्या 11.4 षटकांत संस्मरणीय विजय मिळवला. एम. देवधरने नाबाद 27 धावांची आणि प्रथम सिंगने नाबाद 19 धावांची खेळी साकारत रेल्वेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.





















































