
ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्यावर शनिवारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, कला क्षेत्रातील मान्यवर आणि सबनीस यांनी जोडलेला मित्रपरिवार, त्यांचे शेजारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सबनीस यांच्या रूपाने व्यंगचित्रकलेची निस्सीम सेवा करणारा सच्चा कलावंत हरपला, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
विकास सबनीस यांचे शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. सबनीस रात्री हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले होते. तिथेच त्यांची प्रकृती ढासळली आणि हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी खासदार पत्रकार भारतकुमार राऊत, नगरसेविका विशाखा राऊत, आमदार आशीष शेलार, केसरी टूर्सचे केसरी पाटील, माजी महापौर महादेव देवळे, नितीन सरदेसाई, विजय गोखले, कार्टुनिस्ट कंबाईनचे प्रभाकर वाईरकर, विवेक मेहेत्रे, प्रशांत कुलकर्णी, सुरेश क्षीरसागर आदी उपस्थित होते. सबनीस यांच्या इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत मार्दव स्वभाव आणि सतत हसतमुख राहून सर्वांना मदत करण्याची वृत्ती यामुळे सबनीस सुपरिचित होते. मनमोकळ्या स्वभावाने त्यांनी अनेक माणसे जोडली होती. सबनीस यांचा हा मित्रपरिवार आणि शेजारी मोठय़ा संख्येने त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहिला. स्मशानभूमीत केसरी पाटील, महादेव देवळे, संजय भिडे यांनी सबनीसांच्या आठवणींना उजाळा दिला.


























































