अलिबागमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्कॅनरच्या सहाय्याने बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. विनोद मोकल रा. बोरिस गुंजीस, सध्या राहणार पनवेल, शशिकांत पाटील, रा.शहाबाज अशी त्या आरोपींची नावे आहेत. दोघा आरोपींना 2 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. आरोपींकडून 1 लाख 18 हजार 600 रुपयांच्या बनावट नोटा आणि नोटा छपाईसाठी वापरण्यात आलेले स्कॅनर प्रिंटर असा माल हस्तगत केला आहे.

बनावट नोटा चलनात आणण्याच्या हेतूने दोन इसम अलिबागमधील मेघा टॉकीज परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जे ए शेख यांना गुप्त खबऱ्याकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सचिन निकाळजे यांनी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मेघा टॉकीज परिसरात सापळा रचला होता. तेथे विनोद मोकल आणि शशिकांत पाटील हे दोन इसम आले असता पथकाने झडप घालून त्याची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडे दोन हजार, पाचशे आणि दोनशे रुपयांच्या 1 लाख 18 हजार 600 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे स्कॅनर प्रिंटर पनवेल येथून हस्तगत केले आहे. दोन्ही आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर केले असता 2 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए. शेख पोलीस, उपनिरीक्षक एस.बी. निकाळजे, पोलीस हवालदार कराळे, पाटील, दबडे यांनी ही कारवाई पार पाडली आहे.