
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान असलेल्या संकुलात सोमवारी सायंकाळी 7.20च्या सुमारास आग लागल्याने प्रचंड खळबळ उडाली. लोककल्याण मार्गावरील नऊ नंबर बंगल्यातील स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या रिसेप्शन कक्षाला ही आग लागली. अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने नऊ बंबासह घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. यात पंतप्रधानांचे निवासस्थान वा कार्यालयाचे कोणतेही नुकसान झाले नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या (एसपीजी) रिसेप्शन कक्षाला ही आग लागली असून ती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पंतप्रधान मोदींना एसपीजीच्याच शस्त्र्ाधारी कमांडोंचे सुरक्षा कवच आहे. त्यापार्श्वभूमीवर आगीची गंभीर दखल घेऊन सर्वच सरकारी यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. पोलिसांनी लोककल्याण मार्गावरील वाहतूक बंद केली होती.




























































