कोरठण खंडोबा वार्षिक यात्रा महोत्सव, 10 ते 12 जानेवारी रोजी संपन्न होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील, पिंपळगांवरोठा येथील स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान या राज्यस्तरीय‘‘ब’वर्ग तिथेक्षेत्रावर वार्षिक यात्रा महोत्सव 10 ते 12 जानेवारी 2020 दरम्यान मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने भरणार आहे. 3 दिवसांच्या यात्रेला 6 लाखांवर यात्रेकरु कुलदैवत खंडोबाच्या कोरठण गडावर येऊन देवदर्शन व तळीभंडार करून खोबरे भांडारा उधळून ‘सदानंदाचा येळकोट’,‘‘येळकोट येळकोट जय मल्हार’’या जयघोषाने कोरठणगड दुमदुमत राहील.

सन 2020 या नववर्षातील जिल्ह्यातील ही पहिली मोठी यात्रा असून धार्मिक व सामाजिक संस्कृती जोपसणारी लाखो भाविकांच्या भक्तीमय मांदियाळीचे दर्शन घडविणारी यात्रा म्हणून या यात्रेचे महत्व आहे. पौष पौर्णिमेला श्री खंडोबाचे म्हाळसादेवी बरोबर लग्न झाले म्हणून दरवर्षी पौष पौर्णिमेला 3 दिवस मोठा यात्रोत्सव येथे भरतो. पौष षष्ठीला शेकडो महिला देवाला हळद लावतात व यात्रेचे नवरात्र सुरू होते. यात्रा पूर्वनियोजनासाठी प्रशासनाने सर्व विभागाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ट्रस्ट व प्रशासन तयारी करत आहे

शुक्रवार दिनांक 10 जानेवारी पौष पौर्णिमेला पहाटे 4 वा श्री.खंडोबा देवाला मंगलस्नान, पूजा, चांदीच्या सिंहासनाचे व चांदीच्या उत्सव मूर्तीचे अनावरण होईल. नंतर सकाळी 6 वा अभिषेक, महापूजा, महाआरती होऊन भाविकांना यात्रेतील दर्शनासाठी मंदिरे खुले होईल. दिवसभर तळीभंडार व देवदर्शन सुरू राहील. सायंकाळी 4 वा.श्री. कोरठण खंडोबा पालखी पिंपळगांवरोठा गावात मुक्कामी जाईल. रात्री गावात पालखी छबीना मिरवणूक होईल.

शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी स.5 वा. पासून देवदर्शन सुरू होईल. नंतर श्री खंडोबा पालखीचे स 8 वा. नवीन शाही रथातून पिंपळगांवरोठा गांवातून प्रस्थान होऊन श्री खंडोबा मंदिराकडे पालखी सोहळा आगमनित होईल. दिवसभर भाविकांचे तळीभंडार व देवदर्शन चालू राहील. सायं.4 वा.सावरगांव घुले ता. संगमनेर येथून आलेल्या श्री खंडोबा मानाची पालखीची मिरवणूक व देवदर्शन कार्यक्रम मंदिराजवळ होईल. रात्रौ 9 वा.पर्यंत मंदिराजवळ श्री कोरठण खंडोबा देवाचा पालखी छबीना मिरवणूक होईल.

रविवार दि 12 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. सकाळी 8 वा.श्री खंडोबा चांदिची पालखी आणि अळकुटी, बेल्हे, कांदळी वडगांव, माळवाडी(ता.जुन्नर), सावरगांव घुले(ता. संगमनेर), कासारे, कळस येथून आलेल्या पालख्यांची भव्य मिरवणुक (छबीना) निघेल. दु 12 वा.छबीना मंदिराच्या पायर्‍यांवर येऊन पालख्याच्या मिरवणुकीची सांगता होईल. हा मिरवणूक सोहळा भाविकांच्या डोळ्याची पारणे फेडणारा असतो. दुपारी 1 वा.बेल्हा व ब्राह्मणवाडा येथून आलेल्या मानाच्या काठ्यांची मिरवणूक सुरू होईल. या दोन्ही काठ्या पालखी मार्गावरून मंदिराचे समोर पायर्‍यांवर आल्यानंतर तहसिलदार आणि पोलीस निरीक्षक यांचे हस्ते दोन्ही काठ्यांची शासकीय महापूजा होईल. महाआरती होऊन काठ्यांचे देवदर्शन होईल त्यानंतर वाफारेवाडी, साकोरी, गारखिंडी, कळस येथुन आलेल्या मानाच्या काठ्यांची मिरवणूक होईल. नंतर 2019 पासून येणाऱ्या बुगेवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव सर्व काठ्यांचे देवदर्शन होऊन यात्रेची सांगता होईल

यात्रा काळात श्री. खंडोबा मंदिर ते खंडोबा फाटा हा 1 कि.मी.रस्ता तीन दिवस दोन्ही बाजुंनी सर्व वाहनांसाठी बंद राहील. खंडोबा फाटा व भंडारा टेकडी येथे वाहने पार्किंग व्यवस्था आहे. आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अखंड वीजपुरवठा, मोठा पोलीस बंदोबस्त, वायरलेस, वॉकी टॉकी, वाहतुक नियंत्रण, दंगल नियंत्रक पथक, दर्शनबारी व्यवस्था, दारुबंदी पथक, होमगार्डस, पोलीस मित्र पथक, अळकटी कॉलेज स्वयंसेवक, क्रांतीशुगर कारखाना सुरक्षा पथक, ग्रामस्थ स्वयंसेवक इ.चे चोख नियोजन व बंदोबस्त देण्यात आला आहे. एसटीतर्फे 50 जादा यात्रा स्पेशल गाड्या सोडण्यात याव्यात अशी मागणी केलेली आहे. यात्रेकरुंनी यात्रेत अफवा पसरवू नयेत. तसेच लहान मुले महिला यांना गर्दीत त्रास होऊ नये म्हणून पोलिसांचे विशेष पथक यात्रेत राहणार आहे.

यात्रेत प्लास्टिक वापर, बकरेबळी, गुटखा, मावा, दारुविक्री इत्यादीवर सक्त बंदी आहे. यात्रेत संवेदनशील व गर्दीच्या जागेत जादा सी.सी.टी.व्ही.कॅमेरे लावून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. यात्रेतील मिठाई दुकानदार व इतर विक्रेत्यांना देवस्थानतर्फे जागा निश्‍चित करून देण्यात येणार आहेत. तसेच देवस्थानतर्फे दुकानदारांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यात्रेच्या काळात मंदिरात तळी भरणे, नारळ फोडणे, तेल घालणेस बंदी आहे. यात्रेत दुकानदारांनी गॅस सिलेंडर वापरणेस मनाई आहे. यात्रा उत्सव शांततेत संपन्न होण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा, अधिकारी, पोलीस व देवस्थानाला सर्वांनी सहकार्य करावे असे निवेदन प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, डीवायएसपी अजीत पाटील, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, देवस्थानचे अध्यक्ष अॅड.पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेन्द्र नरड, चिटणीस मनिषा जगदाळे, खजिनदार हनुमंत सुपेकर, अध्यक्ष किसन धुमाळ, अश्विनी थोरात, चंद्रभान ठुबे, मोहन घनदाट, अमर गुंजाळ, किसन मुंढे, बन्सी ढोमे, दिलीप घोडके, साहिबा गुंजाळ, देविदास क्षीरसागर सह सर्व माजी विश्वस्त, तसेच कोरठण पंचक्रोशी ग्रामस्थ,ग्रामपंचायत व मुंबईकर मंडळी यांनी केले आहे.