
तिहार तुरुंगामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महत्वाचे बदल केले आहेत. हे काम सोमवारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तुरुंगामध्ये जेसीबी मशिन आणण्यात आले होते आणि त्याद्वारे खोदकामही करण्यात आले. बोगदा खोदण्यासाठी हे जेसीबी मशिन मागवण्यात आले होते. हे सगळं काम निर्भया प्रकरणातील आरोपींसाठी करण्यात येत आहे.
तिहार तुरुंगामध्ये फासावर लटकावण्यासाठी सध्या एकच तख्त उपलब्ध आहे. जर न्यायालयाने आदेश दिला आणि मुकेश सिंह, विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता या चारही आरोपींना एकाचवेळी फासावर लटकवण्याचे आदेश देण्यात आले तर मग पंचाईत होऊ शकते. त्यामुळे चार आरोपींना एकत्र फासावर लटकावता येईल अशी तयारी करणं तिहार तुरुंग प्रशासनासाठी गरजेचे होते. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे यासाठीचे आवश्यक ते काम तुरुंगात पूर्ण करण्यात आले आहे. फासावर लटकवल्यानंतर कैद्याचा मृतदेह एका बोगद्यात पडतो तिथून तो बाहेर काढावा लागतो. फाशीच्या तख्ताप्रमाणेच तीन अतिरिक्त बोगदेही खोदणं गरजेचं होतं. हे काम देखील पूर्ण करण्यात आले आहे.
न्यायालयाचे पूर्णवेळ कामकाज 6 जानेवारीपासून सुरू होणार आहे. न्यायालय जेव्हा सुरू होतील तेव्हा या आरोपींच्या सद्यस्थितीबाबत तुरुंग प्रशासन न्यायालयाला माहिती देईल. ‘निर्भया’ बलात्कार प्रकरणातील दोषी फाशीपासून वाचण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करून पाहत आहेत. आता क्युरेटिव्ह आणि दया याचिका दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून याबाबत तिहार तुरुंग प्रशासनाने नोटिसीद्वारे दोषींना विचारणा केली होती. कायद्यानुसार आपल्याकडे आणखी काही पर्याय असल्याचे या दोषींनी म्हटले आहे. आता क्युरेटिव्ह आणि दया याचिकेचा वापर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील चारही दोषी पवन, विनय, मुकेश आणि अक्षय यांनी दाखल केलेली फेरविचार याचिका यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दरम्यान, क्युरेटिव्ह याचिकेनंतर दया याचिका दाखल करण्याची राज्यघटनेत तरतूद आहे. दया याचिकाही फेटाळण्यात आली तर त्यांच्या नावाने डेथ वॉरंट जारी करण्यात येते. त्यानंतर त्यांची शेवटची इच्छा काय आहे ते विचारण्यात येते. तिहार तुरुंगातील जेल क्रमांक 2 आणि 4 मध्ये या चारही आरोपींना ठेवण्यात आलं आहे. जर फाशीचे आदेश देण्यात आले तर या चौघांना जेल क्रमांक 3मध्ये हलवण्यात येईल. तुरुंगाच्या याच इमारतीमध्ये फाशीची सोय करण्यात आली आहे.

























































