गेट वे, गिरगाव, जुहू चौपाटीवर महापालिकेचे वॉटर एटीएम, उद्याने आणि बाजारातही सोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांना घराबाहेर पडल्यानंतर स्वच्छ पाणी पिण्यासाठी 15 ते 20 रुपये खर्चून एक लिटर बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते. काही रेल्वे स्थानकांवर ‘वॉटर एटीएम’ची सुविधा उपलब्ध आहे. याच धर्तीवर पालिका मुंबईतील  गर्दीच्या विविध ठिकाणी ‘वॉटर एटीएम’ सुरू करणार आहे. यामध्ये गेट वे, गिरगाव, जुहू चौपाटी अशा ठिकाणांसह मुंबईतील उद्याने, मैदाने, मार्केट, पर्यटन स्थळे अशा ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पालिका मुंबईकरांना मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3958 दशलक्ष लिटर स्वच्छ पाण्याचा पुरवठा करते.

असा राबवणार उपक्रम

पालिका निविदा काढून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवणार आहे. यामध्ये  पालिकेने दिलेल्या ठिकाणी कंत्राटदार मुंबईकरांना एक रुपयात एक लिटर पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देईल. या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहून मुंबईत ‘वॉटर एटीएम’ची संख्या वाढवण्यात येणार आहे.

हेरिटेज प्याऊंच्या दुरुस्तीला वेग

मुंबईत अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन हेरिटेज प्याऊ आहेत. या ठिकाणी मुंबईकरांना शुद्ध पाणी मिळते, मात्र यातील अनेक प्याऊ सध्या बंद अवस्थेत आहेत तर सुरू असणार्‍या प्याऊंच्या ठिकाणी मुंबईकर पाणी पिणे टाळतात. या पार्श्वभूमीवर मुंबईतील ब्रिटिशकालीन प्याऊ दुरुस्ती करून ठिकठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले.