भीमा- कोरेगावमध्ये विजयस्तंभास अभिवादनासाठी उसळला जनसागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित राहतात. यंदादेखील बुधवारी पहाटेपासूनच राज्य व देशभरातील अनुयायांनी येथे मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी हजेरी लावत अभिवादन केले. यावेळी विजयस्तंभ परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती तर सुरक्षेच्या कारणास्तव ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. येथे येणाऱ्या अनुयायांसाठी ठिकठिकाणावरून बसेसची सोय करण्यात आली होती.

भीमा-कोरेगाव ऐतिहासिक लढाईला 202 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारो नागरिक भीमा-कोरेगाव येथे आले आहेत. त्यांच्यासाठी केलेल्या सोयीसुविधा व सुरक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना पवार यांनी राज्यातील जनतेच्या वतीने आपण विजयस्तंभास अभिवादन केल्याचे सांगितले.

जातीय सलोखा राखण्याची परंपरा कायम ठेवा – उपमुख्यमंत्री
अभिवादनानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘सर्वप्रथम महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. येथील विजयस्तंभास एक वेगळा इतिहास आहे. दरवर्षी या ठिकाणी अभिवादनासाठी मोठय़ा संख्येने नागरिक येतात. मी राज्यातील जनतेच्या वतीने विजयस्तंभास अभिवादन करतो. मध्यंतरी काही घटना घडल्या होत्या, मात्र सरकार त्यामध्ये चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे. पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त अतिशय व्यवस्थित ठेवण्यात आला आहे. राज्यभरातून नागरिक या ठिकाणी अभिवादनासाठी येत असतात. शूरवीरांची आठवण ठेवण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी सर्वांनी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी यावे. कोणत्याही प्रकारची अफवा पसरविण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कारण जातीय सलोखा कायम राखत आनंदाने राहण्याची आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा आपण जतन केली पाहिज’ असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.