नेपाळ्यांसारख्या दिसत असल्याचे सांगत २ तरुणींना पासपोर्ट अधिकाऱ्याने हाकलून दिलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंदीगडच्या पासपोर्ट कार्यालयामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इथल्या अधिकाऱ्यांनी दोन तरुणींचे पासपोर्ट बनवण्यास नकार दिला. तुम्ही नेपाळ्यांसारख्या दिसता, तुमचे पासपोर्ट बनवणार नाही असं सांगत अधिकाऱ्यांनी या तरुणींना हाकलून दिलं. हाकलून देत असतानाच या अधिकाऱ्यांनी तरुणींकडून त्या हिंदुस्थानी नागरीक असल्याचे पुरावे मागितले आहेत.

पासपोर्ट कार्यालयात नेमकं काय झालं?

पंजाबमधील अंबाला भागात राहणाऱ्या दोन तरुणी पासपोर्ट मिळवण्यासाठी पासपोर्ट कार्यालयात गेल्या होत्या. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे नीट निरखून पाहिले आणि तुम्ही नेपाळ्यांसारख्या दिसता तुम्हाला पासपोर्ट मिळणार नाही असं कागदावर लिहून दिलं. नागरिकत्व सिद्ध करणारे कागदपत्रेही आणण्याचे या तरूणींना अधिकाऱ्यांनी आदेश दिले. या तरुणींनी पॅन कार्ड, आधार कार्ड, कुरूक्षेत्र विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र अधिकाऱ्यांना दाखवली होती, मात्र ही कागदपत्रे स्वीकारण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.

हे प्रकरण हरयाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांच्यापर्यंत पोहोचले आहे. त्यांनी पोलीस उपायुक्तांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. उपायुक्त अशोक शर्मा यांनी या प्रकरणाबाबत बोलताना सांगितले की त्यांच्या निदर्शनास हे प्रकरण आले असून त्यांनी पासपोर्ट कार्यालयाला कागदपत्रे असूनही पासपोर्ट का देण्यात आला नाही याबाबतची माहिती मागवली आहे. या दोन्ही तरुणींचा पासपोर्ट बनवण्याचे काम सुरू झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.