
नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण उत्साही असतात. नववर्षाच्या सांयकाळी दारू पिऊन आनंद साजरा करणे ही बाब आता नवीन नाही. परंतु अशा वेळी अनेकजण भान विसरतात. अलिबागच्या पेब किल्ल्यावर काही तरुण गांजा आणि दारूच्या नशेत नववर्षाची पार्टी करत होते. त्यांना शिवप्रेमींनी चांगलाच धडा शिकवला आहे.
अलिबाग जिल्ह्यातील पेब किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे. या गडाचा वापर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अन्न धान्य ठेवण्यासाठी केला होता. असे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गडावर मुंबईतील काही तरुण नववर्षाच्या स्वागतासाठी पोहोचले. त्यांनी आपल्यासोबत दारू आणि गांजा आणला होता. दारू आणि गांजाच्या नशेत हे तरुण चांगलेच तर्राट झाले होते. जेव्हा स्थानिक शिवप्रेमींना ही बाब कळाली तेव्हा त्यांनी गडावर धाव घेतली. सर्वप्रथम सगळ्या झिंगाट तरुणांना शिवप्रेमींनी शुद्धीवर आणले. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. नंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा त्यांना द्यायला लावल्या. आणि पुन्हा असे न वागण्याचा अटीवर त्यांना सोडून दिले.


























































