
वराड येथील निवासस्थानी आलेल्या आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर आणि कुटुंबीयांनी दोन दिवस मुक्कामानंतर परतीचा प्रवास सुरु केला आहे. त्यापूर्वी कट्टा येथील सेंट जोसेफ चर्चला त्यांनी भेट दिली. शिवाय जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डान्टस यांच्या निवासस्थानी लिओ वराडकर व कुटुंबीयांनी भेट देत त्याठिकाणी कोकणी मेव्याचा आस्वाद घेतला. व्हिक्टर डान्टस व सहकारी यांनी केलेल्या स्वागताने दस्तुरखुद्द लिओ हे भारावून गेले.
‘माझ्या नावातच गावाचे नाव असल्याने वराड गावचे वराडकर कुटुंबियांशी असलेले ऋणानुबंध जपण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा वराड या गावी येऊ. गावच्या विकासासाठी मी प्रयत्नशील राहीन. आपण माझ्या साठी जो वेळ दिला आणि मला भरभरून प्रेम दिले त्याच्या ऋणातच राहण्यात मी पसंत करीन, असे भावनिक प्रतिपादन आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी कट्टा येथे बोलताना केले.
कट्टा येथील सेंट जोसेफ चर्च याठिकाणी आयर्लडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिस्ती बांधवांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बिशप ऑल्वीन बरेटो यांच्याहस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ख्रिस्ती बांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
































































