
तमाम कुस्तीशौकिनांसाठी पर्वणी असलेली मानाची 63वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घमासान आजपासून (दि. 3) बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगणार आहे. 7 जानेवारीपर्यंत चालणाऱया या स्पर्धेत 34 जिल्हे आणि 11 महानगरपालिका असे एकूण 45 संघ सहभागी झाले आहेत. सर्व शहर व जिल्हा संघातील 900 मल्लांचे थवे छातीचे तवे पुढे काढून रुबाबदार क्रीडानगरीत दाखल झाल्याने अवघे वातावरण कुस्तीमय झाले आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱया या कुस्ती स्पर्धेसाठी जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या (दि. 3) सायंकाळी 6 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे व श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आखाडे सज्ज!
मातीवरील कुस्तीसाठी 2 आणि मॅटवरील कुस्तीसाठी 2 आखाडे स्पर्धेच्या ठिकाणी सज्ज झाले आहेत. येथे मावळ व मुळशी भागातील डोंगरांवरून चांगल्या प्रतीची 40 ब्रास माती आणून 20-20 ब्रासचे दोन आखाडे तयार करण्यात आले आहेत. या मातीत 1000 लिंबू, 250 किलो हळद, 50 किलो कापूर, रोज 100 लिटर ताक आणि 60 लिटर तेल घालून मातीचे आखाडे तयार झाले आहेत.
स्पर्धेसाठीच्या पदकांचे अनावरण
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडतर्पै आयोजित ‘63व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’च्या पदकांचे अनावरण गुरुवारी परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेला साजेसे असे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके या स्पर्धेसाठी बनविण्यात आली आहेत. ऑलिम्पिक पदकांच्या दर्जाची या पदकांची डिझाईन असून, यांचे वजन प्रत्येकी 450 ग्रॅम आहे. प्रत्येकी व्यास 90 सेंमी आहे. वरच्या भागात अमनोरा लिहिलेले असून, वर्तुळात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा लोगो टाकण्यात आला आहे. रोज होणाऱया स्पर्धांच्या शेवटी रोज पदक वितरण समारंभ होणार असून, एकूण 20 सुवर्ण, 20 रौप्य व गादी विभागासाठी 40, तर मातीसाठी 30 कांस्य पदके तयार करण्यात आली आहेत.

























































