हाताच्या ठशावरून पटवली मृतदेहाची ओळख,दादर रेल्वे पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकल अपघातात मृत पावलेल्या पुरुषाची त्याच्या हाताच्या ठशावरून ओळख पटवली. विक्रांत कुमार मानकुमार वर्मा असे त्याचे नाव आहे. त्याची ओळख पटवण्यासाठी दादर रेल्वे पोलिसांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या फिंगर प्रिंट विभागाची मदत घेतली.

विक्रांत हा दादर पूर्व परिसरात पदपथावर राहत होता. चौदा महिन्यांपूर्वी दादर फलाट क्रमांक-3जवळ विक्रांतचा मृतदेह सापडला होता. याची माहिती मिळताच दादर रेल्वे पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी विक्रांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न दादर रेल्वे पोलीस करत होते. वरिष्ठ निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक दीपक कोष्टी, पोलीस शिपाई मधुकर राव आणि विठ्ठल फाळके यांनी तपास सुरू केला. ओळख पटावी याकरिता त्याचे फोटो पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आले होते. तरीही त्याची ओळख पटत नव्हती.

ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी फिंगर प्रिंट विभागाची मदत घेण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या. त्यानुसार पोलिसांनी विक्रांतच्या हाताच्या ठशाचे नमुने फिंगर प्रिंट विभागाकडे पाठवले. त्याचा अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला. हाताच्या ठशावरून पोलिसांनी विक्रांतची ओळख पटवली. विक्रांतविरोधात चार गुन्हे दाखल होते. त्याला गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी विक्रांतवर अंत्यसंस्कारही केले. दादर रेल्वे पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होते आहे. लोकलच्या तिन्ही मार्गांवर होणाऱया अपघातांत दिवसाला 4-5 जणांचा मृत्यू होतो. लाईन क्रॉस करणे, लोकलच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात मृतांची ओळख पटवणे पोलिसांना कठीण असते.