विदर्भात तुफान गारपीट, पिकांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरसह विदर्भात मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. ऐन हिवाळय़ात पावसाळय़ाचा पाऊस अनुभवायला मिळाला. नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीट झाली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत.

बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने आज सकाळी रौद्ररूप घेतले. जिकडेतिकडे अचानक गारांचा पाऊस सुरू झाला. नागपूर शहरातील लाकांना आपण कश्मीरमध्ये आहोत का असा प्रश्न पडला. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसाने अनेक घरांची छपरे उडून गेली तर ग्रामीण भागात शेतामध्ये बर्फाचा थर साचला होता. गहू, हरभरा, संत्रा, तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, तर कापूस ओलाचिंब झाल्यामुळे या कापसाला बाजारपेठेत भाव मिळणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकटांची कुऱ्हाड कोसळली आहे.

प्रचंड गारवा असल्यामुळे सर्वत्र थंड वारे वाहत आहेत. जिकडे तिकडे रस्त्याच्या कडेला शेकोटय़ा पेटवल्याचे चित्र आहे. आज सकाळी नागपूर शहरात अचानक मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू झाला.

चोवीस तासांत मुसळधार पाऊस
सकाळी साडेआठ ते साडेअकराच्या दरम्यान 36.6 मिमीची नोंद झाली होती. नागपूर जिह्यातील काटोल, कळमेश्वर, नरखेड भागातील इसपूर, झिपला, बोरी, मेणकी, चिखली या गावात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. येत्या 24 तासांत नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.