
अमेरिकेने शुक्रवारी सकाळी बगदादच्या विमानतळावर केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे मेजर जनरल कासीम सुलेमानी यांना ठार केले आहे. यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध अधिकच बिघडले असून दोन्ही देश एकमेकांना धमक्या देत आहेत. सुलेमान यांच्या मृत्यूचा ‘खतरनाक’ बदला घेणार असा धमकीवजा इशारा इराणचे सर्वेसर्वा अयातुल्लाह खोमेनी यांनी दिला आहे. तर परदेशात राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांच्या मनातील असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. इराणने सुलेमानींच्या मृत्यूनंतर देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून त्यांना शहीद घोषित केले आहे. यापार्श्वभूमीवर ज्या सुलेमानींसाठी इराण आणि अमेरिका एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत ते नक्की कोण होते याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.
सुलेमानी हे इराणच्या रिवॉल्युशनरी गार्डसची परदेशी शाखा असलेल्या कुर्द फोर्सचे प्रमुख नेते म्हणून जगभरात ओळखले जात होते. सुलेमानी यांनी सिरीया आणि इराक यांच्यातील युद्धात महत्वाची भूमिका बजावली होती. याचदरम्यान, मध्य पूर्वेत इराणचे वर्चस्व वाढू नये यासाठी सौदी अरेबिया आणि इस्त्रायल प्रयत्न करत होते. तर दुसरीकडे अमेरिकाही इराणविरोधात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या स्थितीत इराणचे वर्चस्व कायम ठेवण्यात सुलेमानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे अमेरिका, इस्त्रायल आणि सौदी अरेबियाच्या नजरेत सुलेमानी खलत होते. गेल्या 20 वर्षात या तिन्ही देशांच्या संस्थांनी सुलेमानी यांचा काटा काढण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. पण प्रत्येकवेळी सुलेमानी त्यातून बचावले.
सुलेमानी यांना ईराणच्या सीमेबाहेर काम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यादरम्यान त्यांनी ईसिसला हटवण्यासाठी इराकला मदत केली होती. 1998 साली त्यांना ईराणचे रिवॉल्यूशनरी गार्ड्सचे प्रमुखपद देण्यात आले. यावेलेत त्यांनी कसलाही गाजावाजा न करता ईराणचे इतर राष्ट्रांबरोबर मजबूत संबंध तयार केले.सुलेमानी यांच्या नेतृत्वाखाली रिवॉल्यूशनरी गार्ड्स अल्पावधीतच मजबूत झाली. याच तुकडीच्या माध्यमातून त्यांनी देशाबाहेर गुप्तचर संस्थांचे जाळे विणले. तसेच जगभरात आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात इराणचा दबदबा निर्माण करण्यातही सुलेमानी यांचा मोठा वाटा होता.



























































