
मुंबईच्या वाढणाऱ्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी आणि मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून पालघरमधील गारगाई प्रकल्पाला गती देण्याच्या दिशेने काम सुरु केले आहे. गारगाई प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन, वनीकरण, भूसंपादन, बुडीत क्षेत्राचे सीमांकन, पर्यावरण-जैवविविधतेच्या अभ्यास आणि धरणांची सर्वंकष बांधणीसाठी सुमारे 3 हजार 105 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. येत्या पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार असून मुंबईकरांना 440 दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
पालिकेने मुंबईची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेत डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील दूरगामी धोरण ठरवण्यासाठी समिती स्थापन केली. समितीच्या अहवालानुसार, 2041 पर्यंत मुंबईची अंदाजित लोकसंख्या 17.24 दशलक्ष होणार असून या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी प्रतिदिन 5940 दशलक्ष लिटर्स एवढी अपेक्षित आहे. मुंबईकरांना 3,958 दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे पालघर जिह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावानजिक गारगाई नदीवर 69 मीटर उंचीचे आणि 972 मीटर लांबीचे धरण बांधण्यात येणार आहे. गारगाईचे पाणी मोडकसागरमध्ये आणण्यासाठी जल बोगद्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.


























































