
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे (सीएए) देशात बदललेल्या वातावरणावर गुरुवारी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. देश सध्या कठीण, खडतर काळातून जात आहे. हिंसाचार खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. देशात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे स्पष्ट मत सरन्यायाधीशांनी मांडले. तसेच ‘सीएए’ला संवैधानिक घोषित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास त्यांनी नकार दिला. एखाद्या कायद्याची वैधता तपासणे हे न्यायालयाचे काम आहे. संवैधानिक घोषित करणे नाही, असेही सरन्यायाधीश बोबडे यांनी सुनावले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने संवैधानिक घोषित करावे आणि सर्व राज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करावी असे आदेश द्यावेत अशी मागणी करणारी याचिका पुनित कौर धांडा यांनी दाखल केली आहे. त्यांच्या वतीने गुरुवारी ऍड. विनीत धांडा यांनी युक्तिवाद केला. ‘सीएए’ कायद्याचा विपर्यास करून काही जणांकडून आणि मीडियाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. सरन्यायाधीश बोबडे यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्या कांता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश बोबडे यांनी याचिकेवर आश्चर्य व्यक्त करताना तत्काळ सुनावणीस नकार दिला.
सरन्यायाधीश काय म्हणाले?
- देश सध्या कठीण आणि खडतर प्रसंगातून जात असून, हिंसाचार वाढला आहे. शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले पाहिजे.
- एखादा कायदा संवैधानिक (घटनात्मक) म्हणून घोषित करा, अशी मागणी पहिल्यांदाच न्यायालयापुढे केली जात आहे. कायद्याची वैधता तपासणे हे आमचे काम आहे, संवैधानिक घोषित करणे नाही.
कायद्याला आव्हान देणाऱ्या 59 याचिका
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱया 59 याचिका सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच दाखल झाल्या आहेत. विविध पक्ष, संघटना आणि व्यक्तींनी याचिका दाखल केल्या आहे. काही दिवसांपूर्वी याचिकांवर सुनावणी वेळी न्यायालयाने कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यास नकार दिला होता. याप्रकरणी केंद्र सरकारला नोटीस बजावली होती.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला संवैधानिक घोषित करावे अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. मात्र अशी मागणी न्यायालयाकडे पहिल्यांदाच केले गेली आहे. एखादा कायदा संवैधानिक आहे का नाही हे घोषित करणे न्यायालयाचे काम नाही. कायद्याची वैधता ठरविणे हे आमचे काम आहे.- सर्वोच्च न्यायालय




























































