भुयारी स्थानक बांधण्याच्या बदल्यात बीपीटी देणार एमएमआरडीएला भूखंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीत भुयारी मेट्रो स्थानक बांधण्याचा खर्च कुणी करायचा यावरून पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (एमएमआरडीए) गेली वर्षभर सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. भुयारी मेट्रो स्थानक बांधण्याच्या बदल्यात पोर्ट ट्रस्टकडून एमएमआरडीएला भूखंड दिला जाणार आहे.

वडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस ही मेट्रो रेल्वे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीतून जाणार आहे. त्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट हे स्थानक बांधावे लागणार आहे. एलिव्हेटेडपेक्षा भुयारी स्थानक बांधण्यास तिप्पट खर्च येणार आहे. भुयारी स्थानक बांधण्यासाठी येणार्‍या खर्चापैकी काही रक्कम पोर्ट ट्रस्टने द्यावी असा एमएमआरडीएचा आग्रह होता. परंतु तितका निधी पोर्ट ट्रस्टकडे नसल्याचे पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांनी एमएमआरडीएला कळवले होते.

मेट्रो-11 प्रकल्पातील 8.76 किलोमीटरचा प्रकल्प हा भुयारी आणि 4 किलोमीटरचा एलिव्हेटेड असणार आहे. हा प्रकल्प 8739 कोटी रुपये खर्चाचा आहे. जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन असोसिएशन या प्रकल्पासाठी 2022 कोटी रुपये निधी देणार आहे. उर्वरित तीन हजार कोटींचा खर्च अर्धा-अर्धा करायचा यावर पोर्ट ट्रस्ट आणि एमएमआरडीएमध्ये बोलणी सुरू होती.  एमएमआरडीएला या खर्चाच्या बदल्यात भूखंड देण्याची तयारी पोर्ट ट्रस्टने दर्शवली आहे. त्या भूखंडाचा व्यावसायिक वापर करून एमएमआरडीए महसूल उभारू शकते, मात्र किती भूखंड देणार याबद्दल अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भुयारी मेट्रोच्या 13 स्थानकांचे खोदकाम शंभर टक्के पूर्ण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो रेल्वेच्या स्थानकांच्या बांधकामासाठी खोदकाम करण्यात येत आहे. आतापर्यंत 26 स्थानकांपैकी 13 स्थानकांचे खोदकाम शंभर टक्के पूर्ण झाले असून उर्वरित 13 स्थानकांचे खोदकाम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी माहिती मुंबई मेट्रो रेल महामंडळाने (एमएमआरसीएल) दिली.

कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, सायन्स म्युझियम, सिद्धिविनायक, एमआयडीसी, मरोळ नाका, सहार रोड, सीएसएमआयए आंतरदेशीय, सीएसएमआयए आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सीप्झ या 13 स्थानकांचे खोदकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित स्थानकांचे खोदकामही युद्धपातळीवर सुरू असून ते येत्या तीन-चार महिन्यांत पूर्ण होईल अशी माहिती एमएमआरसीएलचे प्रकल्प संचालक एस. के. गुप्ता यांनी दिली.