
बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात बुधवारी मकरसंक्रांति सण उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने वैद्यनाथ मंदिरात महापूजेची आरास मांडण्यात आली.

सकाळी प्रभू वैद्यनाथ व श्री संत जगमित्र नागा मंदिरात दर्शनासाठी महिलांची गर्दी झाली होती. शहरातील हमाल संघटनेच्यावतीने पारंपारिक पध्दतीने गुळ- साखरा ची शेरणी वाजत गाजत वैजनाथाला आणली, गुळ साखराची शेरणी मंदिर पायऱ्यांवर व शहरात वाटण्यात आली.

श्री आय्याप्पा सेवा ट्रस्टच्यावतीने आय्याप्पा मंदिरात मकर संक्रांतीचे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले व सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत केरळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी वैद्यनाथ मंदिरात आय्याप्पांची मिरवणूक आली त्यानंतर वैद्यनाथ दर्शनमंडपात श्री वैद्यनाथ मंदीराचे विश्वस्त प्रा प्रदिप देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली. केरळीयन नागरिकांच्या वतीने आय्याप्पा मंदिरात बुधवारी कार्यक्रम घेण्यात आले. आय्याप्पा मंदिरात मकरसंक्रांतिचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.



























































