पाण्यातून धावणाऱ्या मेधा लोकलमुळे मिक्स एसी लोकलचा फॉर्म्युला होणार यशस्वी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ac-local-train

एसी लोकलचे डिझाईन एकदा पक्के होऊन सर्व चाचण्यांतून त्या तावूनसुलाखून यशस्वी बाहेर पडल्या की चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यातून एकापाठोपाठ 12 एसी लोकलची रांग लागणार हे पाहून आता पश्चिम रेल्वेकडे दुसरी एसी लोकल चालविण्यावाचून पर्याय उरलेला नाही. त्यामुळे ही लोकल सहा डबे एसीचे आणि सहा डबे साधे अशा पद्धतीने चालवायचे की तीन डबे एसी आणि नऊ डबे साधे अशा फॉर्म्युल्याची निवड करायची यावर काथ्याकूट सुरू आहे. पश्चिम रेल्वेकडे पाण्यातूनही धावणारी मेधा लोकल आल्याने आता तिच्या तीन एसी डब्यांचा वापर करून नऊ डबे साध्या लोकलचे जोडून नवी मिक्स एसी लोकल चालविण्याचे पश्चिम रेल्वेचे नियोजन आहे.

‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार
हैदराबादच्या मेधा लोकलची मोटरसह सर्व उपकरणे डब्याच्या खाली बसवलेली आहेत. त्यामुळे ही लोकल ट्रकमधील पावसाच्या पाण्यात देखील चालविणे शक्य आहे. मोटर आणि उपकरणे लोकलच्या खाली असल्याने या लोकलची प्रवासी क्षमता 10 टक्क्यांनी जादा आहे. शिवाय ‘भेल’ कंपनीची एसी लोकल सहा-सहा डब्यांमध्ये विभागली गेली आहे. सहा डब्यांच्या आत व्हेस्टीबुल गँगवे असल्याने प्रवाशांना एका डब्यातून सहाव्या डब्यापर्यंत चालत जाता येते.

तीन डबे एसीचे आणि नऊ डबे साधे अशा मिक्सी एसी लोकलच्या निर्मितीला रेल्वे बोर्डाकडून औपचारिक मंजुरी मिळावायची बाकी आहे. ती मिळाल्यानंतर हा प्रस्ताव पुढे सरकेल.
-रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, प.रे.