
श्री साईबाबा यांचा पाथरी येथील भुसारी कुटुंबात जन्म झाल्याचा दावा आज पुन्हा पाथरी ग्रामस्थांनी केला. त्याच्या पृष्ठ्यर्थ आज साईबाबा यांची वंशावळच मंदिर समितीच्या विश्वस्थांनी ग्रामसभेत सादर करून तसा ठरावच संमत करण्यात आला. यासंदर्भात उद्या बुधवारी मुख्यमंत्र्यांना भेटून शासकीय समिती स्थापन करण्याची मागणी करणार असल्याचा निर्णयही ग्रामसभेत घेण्यात आला. जोपर्यंत या वादाचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिकाही पाथरीकरांनी घेतली आहे.
शिर्डीतील नागरिकांनी वाद मिटल्याचे सांगितले. मात्र मंगळवारी परभणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनीही पाथरीच्या साईमंदिरात महाआरती करून पाथरीच्या विकासासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर 29 पुरावेच मुख्यमंत्र्यांना सादर करून यासंदर्भात समिती गठित करण्याची मागणी करणार असल्याचे विविध पक्षांच्या नेत्यांनी सांगितले.
पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थळ सिद्ध झाल्याशिवाय थांबणार नाही – खासदार संजय जाधव
शिर्डीकरांचा अकारण वाद निर्माण झाला आहे. पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थळ सिद्ध झाल्याशिवाय आता पाथरीसह परभणीकर थांबणार नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय जाधव यांनी मंगळवारी साई मंदिरात आयोजित विशेष आमसभेच्या बैठकीप्रसंगी दिली. खासदार जाधव पुढे म्हणाले की, साईबाबांच्या जन्माबाबतचे 29 पुरावे मंदिर समितीकडे उपलब्ध आहेत. ते बुधवारी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करणार आहोत. मुख्यमंत्री आमचे म्हणणे ऐकून घेतील. याबाबत शासकीय समिती नेमण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे.
शिर्डी-पाथरी वादात धूपखेड्याची उडी
साई बाबांच्या जन्मस्थानाकरून पेटलेला वाद संपण्याची चिन्हे दिसू लागताच संभाजीनगर जिह्यातील धूपखेडा ग्रामस्थांनीही साईबाबा येथे प्रकटल्याचा दावा करीत या वादाला नवे वळण दिले आहे. साई बाबांच्या जन्मभूमीवरून शिर्डी आणि पाथरीमधील वाद मिटण्याची चिन्हे असतानाच संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील धूपखेडा येथील ग्रामस्थांनी या वादात उडी घेतली आहे. साईबाबा सर्वप्रथम धूपखेडा गावात प्रकटल्याचा दावा येथील ग्रामस्थांनी केला आहे. तसेच साईबाबा ज्या दगडावर बसले तो दगड आणि तेथील कडुलिंबाची गोड पाने करण्याचा पहिला चमत्कार दाखवल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणें आहे.


























































