मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्च रोजी अयोध्येला जाणार, रामलल्लाचे दर्शन आणि शरयू नदीतीरी आरती करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 7 मार्च रोजी अयोध्येला जाणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतील आणि शरयू नदीतीरावर आरतीही करणार आहेत. राज्यातील हजारो शिवसैनिकही मुख्यमंत्र्यांसोबत अयोध्येला रवाना होणार आहेत.

राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या शंभर दिवसांचा कार्यकाळ मार्चमध्ये पूर्ण होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्च रोजी अयोध्येला जातील, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना दिली. हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. त्याचे कोणीही राजकारण करू नये आणि राजकीय दृष्टीने याकडे पाहू नये, असेही खासदार राऊत यांनी या वेळी स्पष्ट केले. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील आमचे सहयोगी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही या दौऱयात सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी अनेक मंदिरांमध्ये जाऊन तेथे दर्शन घेतले आहे, असे खासदार राऊत म्हणाले.

भाजप मेहबुबा मुफ्तींना सोबत नेणार का?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांना सोबत घेऊन जाणार का, अशी विचारणा भाजपवाले करत आहेत. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता खासदार राऊत यांनी भाजपला जबरदस्त टोला हाणला. ते म्हणाले, अयोध्येत राममंदिर उभारण्याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या निर्णयाचे स्वागत केले, मात्र हे भाजपला दिसत नाही. त्यांना हवे तेच ते पाहतात. भाजपने ज्या मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत जम्मू आणि कश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते त्या मेहबुबांना भाजप अयोध्या दौऱयावेळी सोबत नेणार का, असा सवाल खासदार राऊत यांनी विचारला आहे.

– शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 16 जून 2019 रोजी शिवसेनेच्या सर्व खासदारांसह अयोध्येत गेले होते. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी 24 नोव्हेंबर 2018 रोजीही अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले होते. त्या वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे हेसुद्धा सोबत होते.

– उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा 100 दिवसांचा कार्यकाळ मार्चमध्ये पूर्ण होत आहे.