
>> वरद चव्हाण
सोनाली खरे. अभिनेत्री आणि आरोग्य प्रशिक्षकसुद्धा. योगसाधना तिच्या सकारात्मकतेचे रहस्य. शिवाय व्यायाम आहेच.
नमस्कार, फिटनेस फ्रिक्स! आज आपण एका अशा अभिनेत्रीच्या फिटनेस फंडय़ाबद्दल जाणून घेणार आहोत, जिला खरे तर कुठल्याच इन्ट्रोडक्शनची गरज नाही. ‘बेधुंद मनाची लहर’सारखी मालिका असो किंवा ‘सावरखेड एक गाव’, ‘चेकमेट’सारखे सिनेमे असोत, या अभिनेत्रीने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात घर केलं. एवढंच नव्हे तर जसजसे या अभिनेत्रीचे वय वाढतंय, ती अजूनच सुंदर व फिट दिसू लागली आहे.
आजची आपली फिट कलाकार आहे ‘द ग्लॅमरस सोनाली खरे’. सोनालीचं बालपण डोंबिवलीमध्ये गेलं. शाळा-कॉलेजमध्ये असताना फारशी खेळण्याची आवड नव्हती. खो-खो, कबड्डीसारखे खेळ खेळायची; पण ते खेळण्याच्या तासापुरतेच सीमित होते, पण लहानपणापासूनच तिला कलेची आवड होती. त्यामुळे लहानपणापासूनच अभिनय व नृत्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला जात असे. नृत्य म्हणजेसुद्धा एक प्रकारचा व्यायामच नाही का? वाढत्या वयात मैदानी खेळ किंवा नृत्य. मग तो नृत्याचा कुठलाही प्रकार असो; त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो. नृत्यामुळे तुमचं बॉडी पोश्चर चांगलं होतं. सोनाली खरे यांची आई संगीत नाटकात काम करायची. म्युझिशियन गोविंदराव पटवर्धन सोनालीचे मामा आहेत. त्यामुळे संगीतमय वातावरण होतं. आईबरोबरच दूरदर्शनच्या मालिकेच्या शूटिंगदरम्यान सोनालीला एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली. त्यानंतर लगेच तिला ‘दामिनी’ या मराठी मालिकेत काम मिळालं. हळूहळू अभिनयाची गोडी वाटू लागली आणि सोनालीने अभिनयातच करियर करायचं ठरवलं. पण त्या वेळेस व्यायामाचा विचार करावासा तिला वाटला नव्हता. डोंबिवली ते मुंबई हा प्रवासच तिच्यासाठी व्यायामापेक्षा कमी नव्हता. जसजसे काम आणि लोकप्रियता वाढत गेली तसं तिने मुंबईत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिने जिम लावली होती, पण कामाच्या व्यस्ततेमुळे तिला जिमला जाण्यासाठी फारसा वेळ मिळत नव्हता, पण सोनालीच्या आयुष्यात ‘योगा’ने प्रवेश केला. तिचे पती ‘बिजय आनंद’मुळे सुरुवातीला जरी योगा करावा लागला असला तरी हळूहळू सोनालीला योगाची आवड वाटू लागली. ती नियमितपणे योगा करू लागली. ‘योगा’ आता सोनालीच्या आयुष्याचाच एक भाग झाला होता. गरोदर असतानासुद्धा सोनालीने अय्यंगार योगाचा आधार घेतला. योगामुळे गरोदर असतानासुद्धा तिचे मन खूप शांत होतं. गरोदर असताना मूड स्विंग, हार्मोनल इम्बॅलेन्ससारख्या गोष्टींचा त्रास योगामुळे सोनालीला फारसा झाला नाही. तिला खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटू लागले. डिलिव्हरीनंतर मात्र सोनालीने तिच्या या आवडी प्रोफेशनल लेव्हलवर न्यायचं ठरवलं. डिलिव्हरीच्या चार महिन्यांनंतर तिने रीतसर योगाला सुरुवात केली.
1) अष्टांगयोगा 2) बिक्रम योगा 3) अय्यंगार योगाचे प्रशिक्षण घेतलं. तिचे पती कुंडलिनी योगाचे टीचर आहेत. त्यांचे योगाचे क्लासेससुद्धा असतात. सोनालीने तिच्या पतीसोबत एक कंपनी सुरू करायचे ठरवले. या कंपनीचे नाव आहे अनाह रिट्रिट. या कंपनीतर्फे ते मुंबई व मुंबईबाहेरसुद्धा मोठे वर्कशॉप आयोजित करतात. या वर्कशॉपमध्ये योगा व इतर फिटनेसवरील मान्यवरांचे लेक्चर्स असतात व प्रत्येक सभासदाला फिटनेससाठी योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणसुद्धा दिले जाते. आज बिजय आनंदजी योगाची लेक्चर्स हिंदुस्थानातच नव्हे तर हिंदुस्थानबाहेरसुद्धा देतात. सोनाली आज फिटनेस, योगाबद्दल जे काही वाचते किंवा स्वतःच्या नवऱ्याशी किंवा वर्कशॉपमधील विविध मान्यवरांशी बोलून फिटनेसबद्दल जे काही शिकायला मिळते ते कुठल्यातरी डिजिटल प्लॅटफॉर्मवर तिला शेअर करायचं होतं. हेल्दी लाईफस्टाईलची कल्पना, त्याबद्दलची जागरुकता किंवा वर्कशॉपमध्ये न येणाऱ्या लोकांपर्यंत पोहोवायचा होता आणि म्हणूनच तिने ‘वॉव विथ सोनाली’ या चॅनलच्या माध्यमातून चांगले ऑरगॅनिक हेल्दी आयुष्य कसे जगता येईल, कुठले व्यायाम करायला हवेत, योगाचे प्रकार, डाएटबद्दलचं तिचं मत हे आपल्याशी शेअर करते.
आहार किंवा डाएटवर सोनालीचा फारसा विश्वास नाही. आपण अशा सवयी लावायला हव्यात, ज्या आपण आयुष्यभर करू शकू. कुठलाही माणूस डाएट आयुष्यभर करू शकत नाही. कधीतरी त्याचा ताबा सुटतोच आणि डाएटसाठी केलेली मेहनत वाया जाते असं तिचं ठाम मत आहे. आपला आपल्या खाण्यावर कंट्रोल हवा बसं, बाकी काही डाएटची गरज नाही. सोनालीने आता मांसाहार पूर्णपणे बंद केला आहे. सोनाली शुद्ध शाकाहारी झाली आहे. तिचे फिटनेसचे वेड हे आता योगापुरतेच मर्यादित नसून योगाच्या जोडीला पिलाटीज व जीमसुद्धा आहे. सोनालीचं हे फिटनेस वर्ल्ड जर तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर तिच्या यूटय़ूब चॅनल ‘वॉव विथ सोनाली’ ला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या शनिवारी!

























































