मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला विशेष दर्जा देणार, उदय सामंत यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला विशेष संग्रहालयाचा दर्जा देण्याकरिता समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या शिफारशीनुसार या ग्रंथालयाला विशेष दर्जा देऊन संग्रहालयातील दुर्मिळ आणि नवी ग्रंथसंपदा संवर्धन आणि वाचकांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. मुंबईमधील पहिले मराठी ग्रंथसंग्रहालय शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयास विशेष दर्जा देण्यासाठी योग्य तो निधी वितरित करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

संवर्धन व जतन
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात 1956 पासूनचे ‘चित्रा’चे दिवाळी अंक आणि अतिशय दुर्मिळ पोथ्या व ग्रंथ संग्रहालयात आहेत. यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी वेगळा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. ज्या ग्रंथांना लॅमिनेशनची गरज आहे त्याचे लॅमिनेशन करण्यात येईल. या संग्रहालयात मराठी संशोधन मंडळ आणि इतिहास संशोधन मंडळ कार्यरत आहे. यांच्या माध्यमातून नवीन साहित्यनिर्मिती करण्यात येत आहेत, असे ते म्हणले.

यावेळी माजी कुलगुरू व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे उपाध्यक्ष भालचंद्र मुणगेकर, विश्वस्त प्रताप आसवे, अरविंद तांबोली, कार्याध्यक्ष बबन झरेकर, संचालक प्रदीप कर्णिक, कार्यवाह सुभाष नाईक आदी उपस्थित होते.