‘सीएए’ला पाठिंबा द्या, मोदींची एनडीएतील घटक पक्षांना विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) देशभरातून मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. एनडीएचा घटक पक्ष असणाऱया शिरोमणी अकाली दलानेदेखील या कायद्याच्या अंमलबजावणीस विरोध केला आहे. यामुळे केंद्रातील भाजप सरकारची चांगलीच कोंडी झाली असून ‘सीएए’वरून माघार नको तर सर्वांनी पाठिंबा द्या, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएतील घटक पक्षांना केली आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान एनडीएच्या घटक पक्षांची बैठक पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी ‘सीएए’ला देशभरातून विरोध होत असल्याबाबत भाजपच्या मित्रपक्षांनी या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चिंता व्यक्त केली. त्यावर मोदी यांनी ‘सीएए’ कोणत्याही परिस्थितीत मागे घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

‘सीएए’च्या मुद्दय़ावरून डिफेंसिव्ह मोडमध्ये येण्याची काहीच गरज नाही. एनडीएच्या घटक पक्षांनी या कायद्याचे जोरदार समर्थन करावे. अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान विरोधकांकडून करण्यात येणाऱया आरोपांना आक्रमक होऊन उत्तर द्या, अशी भूमिका मोदी यांनी मांडली. अल्पसंख्याक हे अन्य नागरिकांप्रमाणेच आपले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा आणून कोणतीही चूक सरकारने केलेली नाही. त्यामुळे बचावात्मक भूमिका घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे ते म्हणाले.

त्रिपुरामधील ब्रू जमातीच्या लोकांचे पुनर्वसन आणि बोडो आंदोलकांशी केलेल्या समझोत्याबाबत एनडीएतील घटक पक्षाच्या नेत्यांनी या वेळी समाधान व्यक्त केले.

‘एनपीआर’मधील माहितीला जेडीयूचा विरोध
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या (एनपीआर) प्रश्नावलीमध्ये विचारण्यात आलेल्या माहितीला एनडीएचा घटक पक्ष असणाऱया ‘जेडीयू’ने विरोध केला आहे. आई-वडिलांची विस्तृत माहिती विचारण्यात येऊन यासंदर्भातील प्रश्न हटवण्यात यावा, अशी मागणी ललन सिंह यांनी केली. शिरोमणी अकाली दल व एनडीएतील अन्य घटक पक्षांच्या नेत्यांनी त्याचे समर्थन केले. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एनपीआरमध्ये विचारण्यात येणाऱया सर्वच प्रश्नांची माहिती बंधनकारक नसल्याचे यापूर्वी स्पष्ट केले आहे.