
यंदाच्या ऊस गळीत हंगाम राज्यात 310 लाख टनाइतके ऊसगाळप आजअखेर पूर्ण झाले. सुमारे 33 लाख टन साखरेचे उत्पादन हाती आलेले आहे. सरासरी साखर उतारा सरासरी 10.60 टक्क्यांइतका मिळाला आहे. गळीत हंगाम आता मध्यावर आला असताना, साखर उताऱयाची स्थिती लक्षात घेता गतवर्षीच्या तुलनेत चालूवर्षी साखर उताऱयात काहीशी घसरण होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयातून वर्तविण्यात आला.
राज्यात यंदा 77 सहकारी आणि 66 खासगी मिळून 143 साखर कारखान्यांचा ऊसगाळप हंगाम घेतलेला आहे . त्यांपैकी 3 साखर कारखान्यांचा ऊसगाळप हंगाम बंद झालेला आहे. तर, उर्वरित कारखान्यांकडून प्रतिदिन 5 लाख 49 हजार 350 टनाइतक्या उसाचे रोजचे रोज गाळप होत आहे. गाळप हंगामाने चांगला वेग घेतलेला आहे. उर्वरित ऊसगाळप परवाने दिलेल्या कारखान्यांचा हंगाम अद्यापि सुरू झालेले नसल्याचे सांगण्यात आले.
ऊसगळीत हंगामाबद्दल बोलताना विकास विभागाचे साखर सहसंचालक दत्तात्रय गायकवाड म्हणाले, गतवर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे मुळातच ऊस उपलब्धतेत मोठी घट झालेली आहे. गेल्या वर्षीच्या 952 लाख टनावरून प्रत्यक्षात चालूवर्षी 518 लाख टनाइतके कमी ऊसगाळप अपेक्षित आहे. राज्यात झालेली अतिवृष्टी, महापूर आणि पाण्यात बुडालेल्या उसामुळेही उताऱयावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. गतवर्षी 11.26 टक्क्यांइतका साखर उतारा हाती आला होता. तो चालूवर्षी घटून किमान 11 टक्के अपेक्षित आहे. तर, साखर उत्पादन 56 लाख टन होण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे साखर उत्पादनात यंदादेखील कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे.






























































