
दोन भावांचे लागलेले भांडण सोडवण्यासाठी जाणे शेजाऱ्याला चांगलेच महागात पडले. जिवे मारण्याची धमकी देऊन त्याचे डोके फोडण्यात आल्याची घटना लातूर तालुक्यातील मौजे बोपला येथे घडली.
या प्रकरणी नागनाथ दादाराव माने (रा. बोपला) यांनी मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते गावातून घरी आले असता त्यांच्या घराशेजारी राहणारा विशाल तात्याराव हजारे हा त्याच्या लहान भाऊ अमोल तात्याराव हजारे याच्यासोबत भांडण करीत होता. फिर्यादीने दोघांनाही भांडण करू नका, असे सांगत त्या भांडणात पडले. तेव्हा विशाल हजारे याने माने यांना शिवीगाळ करत दगडाने डोके फोडले व जीवे मारण्याची धमकी दिली.
या भांडणाचा आवाज ऐकून गावातील इतर नागरिकांनी धाव घेतली आणि त्यांनी माने यांची सुटका केली. या प्रकरणी पोलीसांनी विशाल तात्याराव हजारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




























































