
केरळमध्ये सोमवारी कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळल्याने देशातील या विषाणूची दहशत आणखी वाढली आहे. चीनच्या वुहान विद्यापीठातून परतलेल्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालातून स्पष्ट झाले. राज्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळल्यानंतर केरळ सरकारने या विषाणूला राज्यावरील आपत्ती म्हणून घोषित केले आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने टास्क फोर्स स्थापन केला आहे.
कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यावर कासारागोड येथील कान्हानगड जिल्हा रुग्णालयातील स्वतंत्र वॉर्डमध्ये उपचार केले जात आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. केरळमध्ये रविवारपर्यंत 104 संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले होते. त्यातील तिघांचे नमुने पॉझिटिव्ह आढळल्याचे आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले. तिसरा रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने टास्क फोर्स स्थापन केले. आरोग्य, गृह, नागरी उड्डाण आणि महिला व बालविकास या मंत्रालयांचे प्रतिनिधी या टास्क फोर्ससाठी काम करणार आहेत.
सिंगापूर, थायलंडहून येणाऱ्या प्रवाशांचीही मुंबईत तपासणी
मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिंगापूर आणि थायलंडहून येणाऱया प्रवाशांचीही कोरोना संसर्गाच्या संशयातून तपासणी केली जात आहे. चीन आणि हाँगकाँगमधून येणाऱया प्रवाशांची 18 जानेवारीपासूनच तपासणी सुरू आहे. याकामी एअरपोर्ट ऑथॉरिटीला मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 25 आरोग्य अधिकारी पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि ठाण्यातील आरोग्य अधिकाऱयांना विमानतळावर तैनात केले जाणार आहे.



























































