वर्धा येथे हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेवरून सामान्यांमध्ये संतापाचा डोंब उसळला आहे. हिंगणघाट प्रकरणाच्या निषेधार्थ मंगळवारी हिंगणघाट येथे मोर्चाही काढण्यात आला आहे. प्राध्यापिकला जाळण्याचा प्रयत्न करणारा आरोपी विकी नगराळे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, सर्वपक्षीय नेत्यांकडून ‘हिंगणघाट बंद’ची हाक देण्यात आली आहे.
मंगळवारी हिंगणघाट येथे झालेल्या या मोर्चात विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यामध्ये पीडित प्राध्यापिकेच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या. मुलीला न्याय मिळावा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. सोमवारीही पीडित प्राध्यापिकेच्या सहकारी आणि विद्यार्थ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन कारवाईची मागणी केली होती. पीडितेला जसा त्रास झाला, तसाच त्रास आरोपीलाही झाला पाहिजे. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी त्यांनी केली होती. दहा दिवसांत चार्जशीट दाखल करून फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्याची मागणी करू, असं आश्वासन पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिलं होतं.
दरम्यान वर्ध्यातील घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेत वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ अहवाल द्यावा आणि कडक कारवाई करावी असे निर्देश आयोगाने दिले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी विकी नगराळे याला पोलिसांनी अटक केली असून मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने विकी याला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दारोडा येथील रहिवासी असलेला विकी हा विवाहित असून त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पीडितेवर त्याचं एकतर्फी प्रेम होतं. सोमवारी सकाळी विकी आपल्या दुचाकीवरून नंदोरी मार्गावर येऊन थांबला होता. पीडिता बसने नंदोरी चौकात आली आणि तिथे उतरून आपल्या कॉलेजच्या दिशेने निघाली. तेव्हा विकीने तिला वाटेत अडवून तिच्यावर बाईकमधील पेट्रोल ओतले आणि पेटवून दिले. पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर तो तिथून पळून गेला.
पीडितेला जळताना पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली आणि तिच्या अंगावर पाणी टाकून आग विझवली. पीडितेचा चेहरा, छाती आणि हाताला भाजल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत. तिला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेत पीडितेची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात तिची मृत्युशी झुंज सुरू आहे.




























































