
यंदा 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्षे होत आहेत. येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग सिंगल यूज प्लॅस्टिकमुक्त करावा, असे आदेश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱयांना दिले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱयांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
20 फेब्रुवारीपर्यंत आराखडा
प्लॅस्टिकबंदीत लोकसहभाग महत्त्वाचा असून या मोहिमेमध्ये शालेय विद्यार्थी, महाविद्यालये, एनएसएस, स्काऊटस् ऍण्ड गाईडस्, स्पोर्टस् क्लब, एनजीओ अशा विविध संस्थांचा सहभाग घेऊन याला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे. यासाठी प्रत्येक महापालिका, नगरपालिका काय करू शकते याचा आराखडा येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
1 मार्चला राज्यस्तरीय परिषद किंवा बैठक घेऊन मार्च आणि एप्रिलमध्ये राज्यभरात मोठी जनजागृती मोहीम तसेच प्लॅस्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून 1 मे पूर्वी संपूर्ण राज्य सिंगल यूज प्लॅस्टिकमुक्त होईल यादृष्टीने नियोजन करावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
































































