‘निर्भया’च्या चारही दोषींना एकाचवेळी फाशीचा आग्रह नको – केंद्र सरकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील ‘निर्भया’ अत्याचार प्रकरणात मृत्युदंड ठोठावण्यात आलेल्या चार दोषींना एकाच वेळी फासावर चढवण्याचा आग्रह नको. कारण तांत्रिकदृष्टय़ा ते शक्य नाही. त्यामुळे या चौघांना वेगवेगळी फाशी द्यावे अशी भूमिका घेत आज केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली. शुक्रवारी न्यायालयाचे त्रिसदस्यीय खंडपीठ केंद्राच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.

केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. ‘निर्भया’च्या चारही दोषींना एकाच वेळी फाशी द्यावी असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिला होता. त्याला केंद्राचा आक्षेप आहे. कारण कायदेशीर आणि तांत्रिक बाजूंचा विचार करता या चारही दोषींच्या क्युरेटिव्ह याचिका आणि दया याचिका एकाच वेळी निकालात निघणे शक्य नाही. त्यामुळे ज्याचा अपिलाचा मार्गच आता संपलाय त्या मुकेशला प्रथम फासावर चढवावे असे केंद्राचे म्हणणे आहे. केंद्र सरकारच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन. व्ही. रामण्णा, न्या. संजीव खन्ना आणि न्या. कृष्णा मुरारी यांचे त्रिसदस्यीय खंडपीठ सुनावणी करणार आहे.

चौघा दोषींना एकत्र फासावर चढवणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य होणार नाही. मग ज्या दोषीपुढील सर्वच मार्ग संपलेत त्याला आणखी वेळ कशाला द्यायचा?
– के. एम. नटराज, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल