
>> शेफ विष्णू मनोहर
रघुनाथ मेदगे. संपूर्ण मुंबईच्या नोकरदार वर्गाला वेळेवर जेवणाचे डबे पोहोचविण्याची जबाबदारी गेली कित्येक वर्षे यांनी पेलली आहे.
मी या आठवडय़ात एका अशा सद्गृहस्थाबरोबर लंच डेट साजरी केली की, जो माणूस दररोज चार लाख लोकांना डबे पोहचवतो. या कामी 8 ते 10 हजार लोक त्यांच्याकडे कार्यरत असतात. ज्याला खुद्द इंग्लंडच्या राजाने चार्ल्स विल्यम याने आपल्या लग्नाला बोलावले होते. हिंदुस्थानातील तीन व्यक्तींचा समावेश होता ज्यात रधुनाथ मेदगे हे एक होते.
रघुथानजी यांना नुसतेच बोलावले नाहीत तर यांचा जाण्या-येण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, व्हिसा या सगळय़ांची जबाबदारी स्वतः प्रिन्सने घेतली होती. रघुलाथजी मेदगे यांची भेट मला नागपुरात आयएमटी कॉलेजमध्ये ते मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसमोर बोलायला आले असताना घडली. अतिशय साधे, वारकरी पंथातील व्यक्तिमत्त्व ज्यांची तिसरी पिढी या कामात कार्यरत आहे. भेटीदरम्यान आमच्या खाण्याला आणि गप्पांना गरम समोश्याने सुरुवात झाली. वारकरी पंथातील असल्यामुळे सरांना अतिशय साधं आणि शाकाहारी जेवण आवडते. कामाचा व्याप मोठा असल्यामुळे प्रत्यक्ष स्वयंपाक बनवत नाही, तरीही स्वयंपाकाची आवड मात्र भरपूर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही अडीच लाख डबे पोहचवणारी संगळी मंडळी शाकाहारी आहेत. सरांना आधी आईच्या हातचे जेवण आवडायचे कालांतराने पत्नीच्या हातचे जेवण आवडायला लागले. त्यांना मेथीचा खुडा, पिठलं, हिरवा ठेचा, भाकर विशेषत्वाने आवडते. गोडामध्ये म्हटलं तर बेसनाची बर्फी आवडते.
त्यांना विचारले की, प्रिन्स चार्ल्सने तुम्हाला निमंत्रण दिल्यावर कसे वाटले त्यावर ते म्हणाले, खरंतर याची सुरुवात फार अगोदर झाली. हिंदुस्थानात ते आले असताना त्यांना आमच्या संघटनेबद्दल कुणीतरी आधी सांगितले होते आणि हिंदुस्थानात आल्या-आल्या त्यांनी मला भेटायची इच्छा व्यक्त केली. आमच्या कामाची दखल प्रिन्सला घ्यावीशी वाटली याचंच मला कौतुक वाटतं. कालांतराने प्रिन्सच्या लग्नाची बातमी कळल्यावर आम्ही आपल्या संघटनेतर्फे प्रिन्सला अहेर पाठवायचा असं ठरवलं. मी असं आवाहन केल्यावर आमच्या वारकरी पंथातील वेगवेगळी मंडळी पुढे सरसावली. याकामी वेगवेगळय़ा कुरीयर कंपन्यांनी मदत केली. हा अहेर पाठविण्याचा मान डीएचएल कंपनीने मिळवला.
अहेर पाठविल्यानंतर तिकडची मंडळी एवढी खूश झाली की, त्यांनी डायरेक्ट लग्नाचे निमंत्रण दिले. नुसतेच निमंत्रण देऊन थांबले नाहीत तर पुढची सर्व जबाबदारी त्यांनी घेतली. तिथे गेल्यावर रघुनाथजींचे स्वागत तेथील पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. लग्नातील जेवणाबाबत सांगताना ते म्हणतात, तिथे जास्तीत जास्त पदार्थ नॉनव्हेजेटिरियन होते, पण त्याचबरोबर शाकाहारी पदार्थसुद्धा होते. याव्यतिरिक्त वेगवेगळय़ा प्रकारचे ड्रायफ्रुट व फळे हे तेथील लग्नातील जेवणाचं आकर्षण होतं. मला आवडलं. रघुनाथजींना वेगवेगळे प्रश्न व त्यांचे अनुभव विचारावे असं मनातून वाटतं तर होतं, पण त्यांच्या वेळेअभावी मला अजून काही जास्त विचारता आले नाही आम्ही आमच्या गप्पा येथेच थांबविल्या.
पिठलं
साहित्य – 2 वाटय़ा बेसन (गुठळीचे), अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे, 1 चमचा चिरलेले लसूण, पाव-पाव चमचा हळद, हिंग, 1चमचा मोहरी, 4 चमचे कोथिंबीर.
कृती – सर्वप्रथम दह्यामध्ये बेसन, हिंग, हळद, मीठ व पाणी एकत्र करून घाला. एका लोखंडी कढईत तेल घालून मोहरी, लसूण, हिरवी मिरची परतून त्यात थोडे पाणी व तयार केलेले बेसनाचे मिश्रण घाला. थोडे घट्ट झाल्यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
मिसळीची भाकर
साहित्य – 1 वाटी ज्वारी, 1 वाटी बाजरी, अर्धा वाटी गहू , अर्धी वाटी चणा डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, चवीनुसार मीठ.
कृती – याकरिता एक वाटी ज्वारी, एक वाटी बाजरी, अर्धी वाटी गहू, अर्धी वाटी चणाडाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ एकत्र करून दळून घ्या. चवीनुसार मीठ घालून कोमट पाण्याने भिजवून भाकऱया करा.
मेथीचा खुडा
साहित्य – 1 वाटी ओली मेथी, अर्धी वाटी कांदा, अर्धी वाटी दाण्याचा कूट, मीठ, साखर, तिखट चवीनुसार.
कृती – ओली मेथी स्वच्छ धुवून नंतर तोडून ठेवा. त्यात बारीक चिरलेला कच्चा कांदा, दाण्याचा कूट, मीठ, थोडी साखर, थोडे तिखट घाला. जेवणाच्या वेळी तोंडी लावायला म्हणून याचा उपयोग केला जातो.
बेसनाची बर्फी
साहित्य – 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तूप, पाऊण वाटी साखर, 2 चमचे दूध पावडर , अर्धा चमचा वेलची, मीठ पाव चमचा.
कृती – बेसन तुपावर चांगले भाजून त्यामध्ये पाव चमचा मीठ घाला. मिश्रणाला बुडबुडे यायला लागले की वेलचीचे दाणे, दूध पावडर आणि साखरेचा घट्ट पाक घालून एकत्र करा. मिश्रण थोडे घट्ट झाले की त्याच्या वडय़ा थापून घ्या. वर एक-एक काजू लावा.



























































