प्रशिक्षणार्थी वाहनाला ट्रकची धडक; वाहक, ट्रकचालक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमसरमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रशिक्षणार्थी एसटीला मालवाहतूक ट्रकने जोरदार धडक दिली. यात ट्रकचालक आणि वाहक जखमी झाले आहेत. सुदैवाने एसतील29 प्रशिक्षणार्थी थोडक्यात बचावले. हा अपघात शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तुमसर- भंडारा राज्य मार्गावर खापा शिवाराजवळ झाला.

भंडारा विभागाचे प्रशिक्षणार्थी वाहन खापा शिवारात तुमसर-भंडारा मार्गावर रस्त्याच्या कडेला उभे होते. मागून येणाऱ्या ट्रकने या एसटीला जोरदार धडक दिली. यात प्रशिक्षणार्थी वाहनाने नुकसान झाले आहे. या अपघातात ट्रकचालक व वाहक जखमी झाले आहेत. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात ट्रकने प्रशिक्षणार्थी वाहनाला धडक दिल्याची माहिती मिळाली आहे. प्रशिक्षणार्थी वाहनात 29 प्रशिक्षणार्थी होते. ट्रकची गती कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. घटनास्थळी तुमसर आगारच्या उपप्रमुख रचना मस्करे यांनी तात्काळ भेट दिली. या अपघातामुळे काहीवेळ भंडारा – तुमसर मार्गाची वाहतूक खोळंबली होती.