परभणीत कृषी विद्यापीठात शनिवारी चौथ्या दिवशीही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणीतील मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी चौथ्या दिवशीही आंदोलन सुरुच ठेवले आहे. कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांच्या कार्यालयासमोर कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयासह सर्वच शाखातील शंभरावर विद्यार्थी -विद्यार्थीनी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. रात्री कडाक्याच्या थंडीतही विद्यार्थी झोपत आहेत. विद्यापीठ प्रशासन बनवाबनवी करत आहे, असा आरोप आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्यात येईल, असा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर कृषी महाविद्यालयासह कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्र महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय आदी सर्वच शाखांतील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी 5 फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. या विद्यार्थ्यांनी 3 फेब्रुवारी रोजी आपल्या मागण्यांचे निवेदन विद्यापीठ प्रशासनाला दिले होते. निवेदनाची दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दिवसभर आंदोलन करून त्याच ठिकाणी कडाक्याच्या थंडीत रात्री विद्यार्थी झोपत आहेत. आपल्या मागण्याबाबत विद्यापीठ प्रशासन गंभीर नसून बनावाबनवी करत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यापीठ प्रशासनाने आंदोलन सोडण्याबाबत एका शब्दाचाही उल्लेख न करता एक लेखी पत्र देत मागण्यांबाबत विद्यापीठ सकारात्मक असून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. वसतीगृहातील असुविधा, सर्व विद्यार्थ्यांना वसतीगृह न मिळणे, वाढलेली भरमसाठ फी, कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा व्यावसायिक दर्जा काढून घेणे, उशिरा निकाल घोषित करणे, शैक्षणिक सहली जाणिवपूर्वक टाळणे, पूर्णवेळ प्राचार्य पदांची नियुक्ती न करणे, ईबीसी सवलतींचे प्रश्न, विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नसणे, विविध शाखांच्या प्राध्यापकांच्या अवेळी झालेल्या बदल्या, रिक्तपदे न भरल्यामुळे निर्माण झालेले प्रश्न, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी ‘कमवा व शिका’ ही योजना, वसतीगृहाची थेट 2 हजार वरुन 6 हजार रुपयांपर्यंत वाढलेली फी अशा अनेक मुद्यावर विद्यार्थ्यांनी माहिती दिली. कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी आंदोलनाची दखल घेत विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणीही आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.