
विठ्ठलाच्या, माऊलींच्या आणि तुकोबांच्या दर्शनाला जायचे असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे कोणी सांगितले की, तुम्हाला परवानगी नाही तर त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजलेला नाही. सच्चा वारकरी अशी भूमिका कधीही घेणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी परिषदेला झापले.
शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत. ते नेहमीच हिंदू धर्म, रामायणाला विरोध करतात. नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळे त्यांना वारकऱयांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलावू नका, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषदेने केले होते. वारकरी परिषदेचे वक्ते महाराज यांनी तसे पत्रकच प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर आळंदीतील जोग महाराज पुण्यतिथी सोहळय़ात उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी कुणाचेही नाव न घेतला बहिष्काराची भाषा करणाऱया वारकरी परिषदेला चांगलेच सुनावले.
विठ्ठलाला भेटायला पंढरीला जायचे असते. माऊलीच्या दर्शनाला आळंदीला जायचे असते आणि तुकोबांसाठी देहूला जायचे असते. याच भावनेने आळंदीत येऊन माऊलीचे दर्शन घेतले. पंढरपूरला मी नेहमी जात असतो, मात्र त्याची प्रसिद्धी करत नाही. पहाटे लवकर जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतो. मला कुणाच्याही परवानगीची गरज लागत नाही, असा टोला पवार यांनी लगावला. मला पसंत असलेल्या रस्त्याने मी जाईन, माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इंद्रायणी नदी स्वच्छ करणे हे कर्तव्यच
इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेची वारकऱयांनी केलेली मागणी ही समाजाच्या हिताची आहे. ही मागणी मला व्यक्तिशः भावलेली आहे. हे वारकऱयांचे वैयक्तिक काम नाही. ही मागणी पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. ते नक्की पार पाडेन. याबाबत सरकारमधील संबंधित मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांना तशी विनंती करेन, असे शरद पवार यांनी सांगितले.





























































