
मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक मंगळवारी होणार आहे. उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या बैठकीचे आयोजन केले असून यात मराठा आरक्षणासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. गेल्या आठवडय़ात मंत्रिमंडळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन केली. या समितीसंदर्भात आजच शासन निर्णय जारी झाला असून, चव्हाण यांनी तातडीने समितीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला.
मंगळवारी दुपारी 3 वाजता विधान भवनमध्ये ही बैठक होणार असून, याप्रसंगी समितीचे सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील व विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी विधान भवन येथे अशोक चव्हाण यांची भेट घेतली व आपल्या मागण्यांसंदर्भात बाजू मांडली.


























































