
पालिकेच्या ‘आर-मध्य’ विभागाने आज दहिसर नदी आणि लगतच्या परिसरातील 95 बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवल्याने दहिसर नदीच्या रुंदीकरण-खोलीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कारवाईला स्थानिकांचा विरोध होण्याच्या शक्यतेमुळे 150 पोलिसांचा ताफा आणि ड्रोनची नजर ठेवून पालिकेच्या 190 कर्मचारी-अधिकाऱयांनी ही धडक कारवाई केली.
पालिकेच्या ‘आर मध्य’ विभागातील बोरिवली पूर्व परिसरातून वाहणाऱया दहिसर नदीलगतच्या परिसरांचा समावेश होतो. या परिसरात पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यास नदीलगतच्या परिसराला धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर या नदीकिनारी 738 फूट लांबीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यातील 377 फुटांची भिंत यापूर्वीच बांधण्यात आली आहे. मात्र नदीलगत असणाऱया संजय नगर व हनुमान नगर या परिसरातील 95 बेकायदा झोपडय़ांमुळे उर्करित 361 फूट लांबीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम प्रलंबित होते, स्थानिकांच्या विरोधामुळे ही कारवाई प्रलंबित होती. या पार्श्वभूमीवर परिमंडळ-7 चे उपायुक्त विश्वास शंकरकार यांच्या मार्गदर्शखाली मुंबई पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आल्याचे ‘आर मध्य’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी सांगितले.
पावसाळ्यात बोरिवलीतील पाण्याचा निचरा वेगाने होणार
अतिवृष्टी झाल्यास मोठय़ा प्रमाणात बोरिवलीचे पाणी दहिसर नदीत येते. मात्र या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे परिसरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लगतो. मात्र आता या कारवाईमुळे दहिसर नदीच्या संरक्षक भिंतीचे काम वेगाने होणार असून नदीचे रुंदीकरण-खोलीकरणही करण्यात येणार आहे. यामुळे पावसाळ्यात बोरिवलीतील पाण्याचा निचरा वेगाने होण्यास मदत होणार असल्याचे सहाय्यक आयुक्त कापसे यांनी सांगितले.
































































