
उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 3 हजार टन सोन्याचा खजिना सापडल्याचं वृत्त आहे. लवकरच या सोन्याचा लिलाव होणार असून यासाठी सरकारतर्फे सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील सोनभद्र या ठिकाणी पर्वतीय प्रदेशांमध्ये हा खजिना सापडला आहे. 2005पासून या प्रदेशांमध्ये जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेतर्फे उत्खननाचं काम सुरू होतं. सोनभद्रच्या काही विशिष्ट भागांमध्ये सोनं असल्याचा अहवालही या संस्थेने दिला होता. मात्र, 2012ला हा अहवाल जाहीर झाल्यानंतर आजतागायत तिथे पुढील कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, आता राज्य सरकारने या सोन्याच्या लिलावाच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
सोनभद्रच्या कोन तालुक्यातील हरदी आणि दुध्धी तालुक्यातील महुली या दोन गावातील डोंगराळ प्रदेशात सोनं सापडलं आहे. हरदी येथे तब्बल 646.15 किलो इतकं तर महुली येथे 2943.25 किलो इतकं सोनं सापडलं आहे. या सोन्याचा ई-निविदा मागवून लिलाव केला जाणार आहे. यासाठी क्षेत्राचं टॅगिंग करणं गरजेचं असल्याने सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
या परिसरातील फुलवार आणि सलैयाडीह येथे एडालुसाईट, पटवध येथे पोटॅशियम, भरहरी येथे लोहखनिज आणि छपिया ब्लॉक येथे सिलिमेनाईटचेही साठे शोधण्यात येत आहेत. तसेच सोनभद्रमध्ये युरेनियमचेही साठे असण्याची शक्यत आहे. त्याच्या शोधार्थही उत्खनन सुरू आहे.

























































